Vadgaon Sheri News : पादचाऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; नगर रस्ता, अतिरिक्त आयुक्त आणि आमदार पठारे यांच्याकडून पाहणी
esakal September 13, 2025 11:45 PM

वडगाव शेरी - येरवड्यातील शास्त्रीनगर चौक उड्डाणपुलाच्या कामाला या आठवड्यात सुरुवात होणार असल्यामुळे या चौकात वाहतुकीत मोठे बदल करण्यात येणार आहेत. तसेच नगर रस्त्यावरील पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि आमदार बापूसाहेब पठारे यांनी घेतला. त्यांनी प्रस्तावित उपाय योजनांची माहिती घेऊन सूचना दिल्या.

यावेळी आमदार पठारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, वाहतूक पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, येरवडा, विमानतळ आणि चंदननगर वाहतूक विभागाचे तीन पोलीस निरीक्षक, पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धारव, स्थानिक माजी नगरसेवक ॲड. भैय्यासाहेब जाधव, किशोर विटकर, महेंद्र पठारे उपस्थित होते.

शास्त्रीनगर चौक येथे कल्याणी नगर, महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड, नगर रस्ता, डॉन बॉस्को रस्ता येऊन मिळतात. त्यामुळे चौकात कायमच मोठी रहदारी असते. एका चौकात 100 मीटर अंतरावरील दोन सिग्नलमुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडते. यावर उपाय म्हणून या चौकात उड्डाण पूल आणि ग्रेड सेपरेटर चे काम होणार आहे.

नगरहून पुण्याकडे येताना शास्त्रीनगर चौकातून गोल्फ क्लब चौकाकडे जाणारे उजव्या बाजूचे वळण बंद होणार आहे. ती वाहतूक वाडीया बंगल्यासमोरून उजवीकडे वळून कर्णे पथावरून डॉन बॉस्को रस्त्यावरून गोल्फ चौकाकडे आणि सह्याद्री हॉस्पिटल कडे जाईल. यासाठी शास्त्रीनगर चौकातील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे.

त्याची पाहणी मनोज पाटील आणि आमदार पठारे यांनी केली. खुळेवाडी येथील नागरिकांना रस्ता ओलांडता येण्यासाठी बायपास चौकाच्या अलीकडे यु टर्नची व्यवस्था करण्याचे ठरले. यासोबतच खराडी, रामवाडी, शास्त्रीनगर येथील सर्विस रस्ते, पडीक जागा वाहतुकीसाठी उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शास्त्रीनगर चौकात उड्डाणपुलाच्या कामासाठी वाहतुकीत बदल अपरिहार्य असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मनोज पाटील (अतिरिक्त पोलीस आयुक्त) -

नगर रस्त्यावरील सिग्नल फ्री योजनेमुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटली असून वाहतुकीचा वेग वाढला आहे. पुणे महानगरपालिकेला सांगितल्याप्रमाणे पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी काम सुरू झाले आहे. शास्त्री नगर चौकातील उड्डाणपुलाच्या कामाकरिता येथील वाहतूक बदल अपरिहार्य आहे. नागरिकांनी सहकार्य करावे.

बापूसाहेब पठारे (आमदार, वडगाव शेरी) -

नगर रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि सुरक्षित वाहतुकीसाठी पुणे महानगरपालिकेला सुरक्षा चिन्हे आणि सूचनाफलक लावण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याचे काम सुरू झाले आहे. पादचाऱ्यांची सुरक्षा सर्वात जास्त महत्त्वाची आहे.

नगर रस्त्यावर या उपायोजना करणार…

१. उड्डाण पुलाच्या कामासाठी शास्त्रीनगर येथील वाहतूक कर्णे रस्त्यावरून वळवणार.

२. सुरक्षित रस्ता ओलांडता यावा यासाठी सुरक्षा चिन्हे लावायला सुरुवात.

३. नो एन्ट्री मधून येणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई वाढवणार.

४. यु टर्न जागी लहान वाहतूक बेटे उभारणार.

५. आपले घर सोसायटी आणि दर्गा परिसरातील सर्विस रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध करणार.

६. खुळेवाडीतील नागरिकांना यु टर्न उपलब्ध करून देणार.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.