Nagpur Accident: खापा मार्गावर आयशरने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
esakal September 13, 2025 11:45 PM

सावनेर : येथील प्रा. डॉ. प्रकाश रामचंद्र काकडे यांचे अपघाती निधन झाले. दुपारी ४ च्या सुमारास महाविद्यालयाला सुटी झाल्यानंतर शेतावर जाण्याकरिता, एम एच ४० डीडी ६६४४ क्रमांकाच्या बुलेटने खापा चौकातून विद्यार्थिनी तनू संजय मरस्कोल्हे (वय १९) हिला रा. आजनीला सोडण्यासाठी निघाले असता खापा मार्गावर रेल्वे क्रॉसिंग सावनेर समोरील वळणावर आयशरने जोरदार धडक दिली.

ज्यामुळे प्रकाश काकडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेली विद्यार्थिनी हे गंभीर जखमी असून, तिला नागपूर रेफर करण्यात आलेले आहे. प्रा. डॉ. प्रकाश काकडे हे परिसरातील सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ होते.

शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे योगदान मोठे असून विद्यार्थ्यांमध्ये ते अत्यंत लोकप्रिय होते. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे महाविद्यालयीन वर्तुळात तसेच गावातही शोककळा पसरली आहे.

Ahilyanagar Crime:'अहिल्यानगरमध्ये पतीने घरातच गळफास घेऊन संपवले जीवन'; पत्नी विरुद्ध गुन्हा, वेगळचं कारण आलं समाेर..

अपघाताची माहिती मिळताच सावनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आयशर वाहनचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या वळणावर अपघाताचे प्रमाण मोठे असून वाहतुकीवर अधिक नियंत्रण आवश्यक असल्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. या अपघातामुळे एक लोकप्रिय प्राध्यापक कायमचे हरपल्याची भावना विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.