काटेवाडी, ता. १२ : बारामती उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने थकीत कर वसुलीसाठी मोटार वाहन कायद्यान्वये ताब्यात घेतलेली वाहने येत्या सात दिवसांत ताब्यातून सोडवून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने थकीत कराच्या वसुलीसाठी संबंधित वाहन मालकांना कर व दंड भरण्याबाबत तीन वेळा नोटिसा बजावल्या आहेत. मात्र. अद्याप अनेकांनी कर व दंडाचा भरणा केलेला नाही. ताब्यात घेतलेल्या वाहनांची यादी कार्यालयाच्या सूचना फलकांवर लावली असून, त्यापैकी १६ वाहनांचे मालक अथवा ताबेदारांनी कार्यालयाशी संपर्क साधून लवकरात लवकर वाहन सोडवून घ्यावीत, असे आवाहन केले आहे. निर्धारित मुदतीत वाहनांचा ताबा न घेतल्यास या वाहनांच्या जाहीर लिलावाची प्रक्रिया मंगळवारी (ता. २३)https://www.mstcecommerce.com/ या संकेतस्थळावर राबविण्यात येईल, अशी माहिती उप प्रादेशिक अधिकारी सुरेंद्र निकम यांनी दिली.