श्री देव रामेश्वर-गांगेश्वरचा
गुरुवारी भेट सोहळा
मालवण, ता. १२ : कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर आणि महान गावाचे ग्रामदैवत श्री देव गांगेश्वर या दोन्ही देवतांचा वार्षिक पारंपरिक भेट सोहळा येत्या गुरुवारी (ता.१८) महान गावात साजरा होणार आहे. या सोहळ्यात रयतेच्या रक्षणासाठी श्री देव गांगेश्वर देवालयातून दिले जाणारे ‘राखणीचे श्रीफळ’ राणे-परब बारापाच मानकरी यांच्याकडे सुपूर्द केले जाईल.
कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर देवस्थानाचे राणे-परब मानकरी गुरुवारी सकाळी श्री रामेश्वर मंदिरात जमतील. येथे गाऱ्हाणे घातल्यानंतर ते ढोल, ताशा, अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि पूर्ण लवाजम्यासह कांदळगावच्या माळरानावरून जुन्या पारंपरिक मार्गाने चालत महान गावाकडे प्रयाण करतील. सकाळी महान गावामध्ये श्री देव गांगेश्वर देवाची विधिवत पूजा, अभिषेक आणि रक्षण-राखण करण्याच्या श्रीफळाचे पूजन केले जाईल. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. पूजेनंतर गांगेश्वर देवाला कौल लावून रक्षण राखणीचे श्रीफळ परब मानकरी यांच्याकडे सोपवले जाईल. हे श्रीफळ घेऊन सर्व राणे-परब बारापाच मानकरी पुन्हा वाद्यांच्या गजरात माळरानावरून चालत कांदळगावला परत येतील. हे श्रीफळ नवरात्रीच्या उत्सवादरम्यान कांदळगाव येथील श्री सातेरी देवी मंदिरात ठेवण्यात येईल. या नऊ दिवसांमध्ये मंदिरात भजन, पूजन आणि जागर असे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. दसरा उत्सवाच्या दिवशी हे राखणीचे श्रीफळ बारापाच मांडावर आणले जाईल. या सोहळ्याला कांदळगाव रामेश्वर देवस्थानचे राणे-परब बारापाच मानकरी आणि महान श्री देव गांगेश्वर देवस्थानचे बारापाच मानकरी उपस्थित राहणार आहेत.