91226
रोणापाल दयासागर वसतिगृहास
‘योग विद्या’मार्फत धान्य, वस्तू
बांदा, ता. १३ ः मानव सेवा हीच ईश्वर सेवा, या भावनेतून मुंबई येथील योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई या संस्थेतर्फे रोणापाल येथील दयासागर वसतिगृहास वर्षभर पुरेल अशा सुमारे २ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. यात धान्यासह इतर वस्तूंचा समावेश आहे.
या सेवाभावी संस्थेतर्फे गेल्या दोन वर्षांपासून असे उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. संस्थेचे संस्थापक व मार्गदर्शक मास्टर चोआ कॉक सुई यांच्या नावे फिरते वैद्यकीय पथक सह्याद्री पट्ट्यात सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभरापासून कार्यरत आहे. समाजातील खऱ्याखुऱ्या गरजवंतांचा शोध घेऊन ही मदत केली जात असल्यामुळे या संस्थेची ही मदत खऱ्या अर्थाने सार्थकी लागते. यापुढेही जिल्ह्यात गरजवंत समाजासाठी विविध उपक्रम राबविण्याचा या संस्थेचा मानस आहे. सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार ठाकरे आणि त्यांचे सहकारी गेली अनेक वर्षे शहरासह ग्रामीण व अतिदुर्गम भागात सातत्याने विविध उपक्रम राबवतात. मुंबईतील ही संस्था डॉ. ठाकरे यांच्या माध्यमातून दोन वर्षांपासून जिल्ह्यात कार्यरत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरजूंना मिळवून देण्याचा मानस डॉ. ठाकरे यांनी व्यक्त केला. दयासागर वसतिगृहाचे जीवबा वीर यांनी संस्थेचे आभार मानले. यावेळी क्रियान्वयन फाउंडेशनच्या सेवाभावी कार्यकर्त्या डॉ. मुग्धा ठाकरे, डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, मंगल कामत आदी उपस्थित होते.