रावेत : दुर्गा टेकडी परिसरातील बीआरटी मार्गातील धर्मराज उड्डाणपुलावर अल्पावधीतच खड्डे पडले आहेत. पाऊस सुरू असताना या खड्ड्यांत आणि रस्त्याकडेला पाणी साचल्याने वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. निचरा होत नसल्याने पुलावर ठिकठिकाणी पाणी साचत आहे.
धर्मराज पुलावर करण्यात आलेल्या रस्ते कामाबाबत स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांनी दर्जाबाबत शंका उपस्थित केल्या आहेत. पूल सुरू होऊन वर्षही झाले नसताना खड्डे पडणे म्हणजे निकृष्ट कामाचे द्योतक असल्याचा आरोप होत आहे.
या मार्गावरील नियमित प्रवासी संजय पाटील म्हणाले, ‘‘धर्मराज पुलावरून सकाळ-सायंकाळ वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. पण, खड्ड्यांमुळे वाहन चालवताना अपघात होण्याची भीती सतत जाणवते.’’
स्थानिक रहिवासी प्रियांका शिंदे म्हणाल्या, ‘‘पुलावर पाणी साचल्यामुळे रात्रीच्या वेळी खड्डे लक्षात येत नाहीत. अनेक वेळा दुचाकीस्वार घसरून पडले आहेत. प्रशासनाने तातडीने लक्ष द्यायला हवे.’’
दरम्यान, पुलाच्या या स्थितीबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, ते उपलब्ध झाले नाहीत.
धर्मराज पुलावर इतक्या लवकर खड्डे पडले, यावरून कामाची गुणवत्ता किती निकृष्ट आहे हे दिसते. तसेच, पुलावरील पाणी निचरा व्यवस्थेवरही लक्ष देऊन आवश्यक बदल करण्यात यावेत. नागरिकांना होणारा त्रास प्रशासनाने कमी करावा.
- अमोल कदम, वाहनचालक