मराठी चित्रपट : दशावतार प्रेम, सूड, श्रद्धा आणि त्यागाची उत्तम गुंफण
esakal September 14, 2025 05:45 PM

- संतोष भिंगार्डे
भारतात अनेक लोककला प्रकार आहेत आणि त्या-त्या राज्यांमध्ये त्या प्रसिद्ध आहेत. या लोककलांनी समाजमन समृद्ध केलेच, शिवाय चांगले संस्कार घडविले आणि समाजप्रबोधनही केले. अशीच एक लोककला म्हणजे ‘दशावतार’. कोकणातील लोकजीवनात ‘दशावतार’ ही कला केवळ नाटक म्हणून नाही तर श्रद्धा, परंपरा आणि आनंदाचा उत्सव म्हणून रुजलेली आहे. गावागावांमध्ये-खेडोपाड्यांमध्ये रंगणाऱ्या या खेळातून समाजाने एकात्मता, संस्कार आणि संस्कृतीचा धडा घेतला आहे. आजचा काळ बदललेला आहे. प्रेक्षकांच्या आवडीनिवडी बदललेल्या आहेत. तरीही या कलेचा आत्मा जिवंत आहे. त्याच आत्म्याला रुपेरी पडद्यावर नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न म्हणजे ‘दशावतार’ हा चित्रपट.
सुबोध खानोलकरने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. आपले संपूर्ण जीवन दशावतारासाठी वाहून घेतलेले बाबुली (दिलीप प्रभावळकर) आणि त्यांचा मुलगा माधव (सिद्धार्थ मेनन) यांच्याभोवती फिरणारी ही कथा असली तरी त्यातून चांगला सामाजिक संदेशही दिला आहे.
बाबुली आणि त्यांचा मुलगा माधव एका गावामध्ये सरळ आणि साधे जीवन जगत असतात. माधव नोकरीच्या शोधात असतो तर त्याचे वडील बाबुली उतारवयाकडे झुकलेले असतात आणि त्यांची नजरही कमजोर होत चाललेली असते. डॉक्टरांनी त्यांना नजरेच्या बाबतीत धोक्याचा इशाराही दिलेला असतो; परंतु बाबुलीचे कलेवर नितांत प्रेम असते. त्यांच्या अंगामध्ये दशावतार भिनलेला असतो; मात्र त्यांचा मुलगा माधवला आता आपल्या वडिलांनी अशा प्रकारची दगदग आणि ताण सहन करू नये, त्यांनी दशावताराला राम राम करावा, असे वाटत असते. तो आपल्या वडिलांना तसे सांगतोदेखील; परंतु ते दशावतार सोडायला तयार नसतात. तरीही माधव त्यांना कसेबसे राजी करतो. आता महाशिवरात्रीच्या रथयात्रेत आपण शेवटचे सोंग घेणार असे बाबुली माधवला वचन देतात आणि त्यानंतर कथानकाला वेगळे वळण मिळते.
लेखक व दिग्दर्शक सुबोध खानोलकरने दशावताराच्या या कथेला चांगले टर्न आणि ट्विस्ट दिले आहेत. प्रेम, सूड, श्रद्धा आणि त्याग यांची उत्तम गुंफण करताना सामाजिक संदेशही छान दिला आहे. दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, रवी काळे, सुनील तावडे, विजय केंकरे, आरती वडगबाळकर आदी कलाकारांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने या चित्रपटाला चार चांद लावलेले आहेत. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर हे एक अष्टपैलू अभिनेते आहेत. या वयातही त्यांचा उत्साह दांडगा आहे आणि त्यांनी ही भूमिका समरसून साकारली आहे. अभिनय बेर्डे आणि भरत जाधव यांच्या वाट्याला काही मोजकेच सीन्स आले आहेत आणि त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. कलाकारांची मोठी फौज, सिनेमॅटोग्राफी, संगीत अशा काही बाबी या चित्रपटाच्या जमेच्या आहेत.
कोकणातील निसर्ग, तेथील संस्कृती, बोलीभाषा, राखणदाराची सांगितली जाणारी दंतकथा वगैरे बाबी दिग्दर्शकाने छान टिपलेल्या आहेत. व्हीएफएक्स तंत्रज्ञानाची उत्तम जोड या चित्रपटाला लाभलेली आहे. चित्रपटाचा पूर्वार्ध चांगलाच खिळवून ठेवणारा झाला आहे. मात्र उत्तरार्धात दिग्दर्शकाची पटकथेवरील पकड काहीशी सैल झाली आहे. कोकणातील या लोककलेला आधुनिक धाग्याने जोडण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे आणि कोकणाचा विकास करताना किंवा चांगले व उत्तम प्रोजेक्ट आणताना तेथील निसर्गाचा विचार करणे आणि जनमताचा आदर राखणे आवश्यक आहे, हे सांगण्याचा प्रयत्न यातून केला आहे.

- तीन स्टार

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.