शहापूर तालुक्यात 'सेवा पंधरवडा' उपक्रम राबविणार
esakal September 14, 2025 03:45 PM

शहापूर, ता. १३ (वार्ताहर) : नागरिकांच्या दैनंदिन समस्यांना वेगाने दिलासा देण्यासाठी महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिमान व पारदर्शक व्हावे, या हेतूने सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस १७ सप्टेंबरपासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबरपर्यंतच्या पंधरवड्यात छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान अभियानांतर्गत ‘सेवा पंधरवडा’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी सरकारी निर्णयानुसार तालुक्यातील महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सेवा पंधरवडा तीन टप्प्यांत राबविला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात शहापूर तालुक्यातील पाणंद व शिवरस्त्यांचे सर्वेक्षण करून त्यांना क्रमांक देणे, गाव नकाशावर रस्ते चिन्हांकित करणे, नोंद नसलेल्या रस्त्यांची नोंद घेणे, शेतावर जाण्यासाठी संमतीपत्र घेणे, रस्ता अदालत घेऊन प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे; तसेच शेतरस्त्यांची मोजणी व सीमांकन करणे यावर भर दिला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात शासकीय जमिनींचे पट्टे लाभार्थ्यांना वाटप करणे आणि अतिक्रमणे नियमबद्ध करून वैध करणे हे काम केले जाईल. तिसऱ्या टप्प्यात ‘सर्वांसाठी घरे’ हा उपक्रम तसेच काही नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार आहेत.

शैक्षणिक समस्या सोडवण्यास प्राधान्य
तहसीलदार कासुळे यांनी विशेषतः विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबींवर लक्ष केंद्रित केले आहे. आदिवासी पाड्यांवर जन्म दाखला नसल्याने अनेक मुलांना आधार कार्ड मिळण्यात अडचणी येतात. त्यामुळे त्यांची शैक्षणिक संकेतस्थळांवर नोंद होत नाही आणि शाळांची मान्यता धोक्यात येते. या समस्येवर तोडगा म्हणून १५ दिवसांत सर्व विद्यार्थ्यांना जन्म दाखल्यांचे वाटप करण्यात येणार आहे. एकही विद्यार्थी जन्म दाखला आणि आधार कार्डविना राहणार नाही, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. या सेवा पंधरवडा अभियानांतर्गत व त्यात नाविन्यपूर्ण घेण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे नागरिकांच्या व विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर होण्यास मदत होईल, असे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.