महुडे, ता.१३ : भोर तालुक्यातील शिंद, गवडी व किवत येथील शिक्षणासाठी भोरला ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेवर एसटी सेवा उपलब्ध होत नसल्याने शाळकरी मुलांची गैरसोय होत आहे. यासाठी शाळेच्या वेळेत सकाळी व दुपारी भोर-शिंद ही एसटी सुरू करावी अशा मागणी श्री वीर बाजीप्रभू प्रतिष्ठान कसबे शिंद तसेच ग्रामस्थांनी शनिवारी (ता.१३) भोर आगार व्यवस्थापक यांना निवेदन देऊन केली. भोर आगाराचे स्थानक प्रमुख प्रदीप इंगवले यांनी हे निवेदन स्वीकारले.
यावेळी शिंदचे माजी सरपंच रामदास भोंडवे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौरव शेडगे, प्रदीप भालेघरे, ज्ञानेश्वर खुटवड, अमीर कोंढाळकर, सचिन जाधव, योगेश खुटवड, कुमार साळुंखे, सचिन इंगवले, भानुदास दुधाणे, विलास दानवले, सुभाष साळुंखे,भालचंद्र सुतार, भाऊसाहेब सालगुडे आदी उपस्थित होते. शिंद, गवडी व किवत येथून भोरला शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. सकाळी सात वाजता येणारी महुडे भोर ही एसटी महुडे बुद्रूक, महुडे खुर्द, माळेवाडी, ब्राह्मणघर, नांद या गावावरून शिंदला येताना पूर्ण क्षमतेने प्रवाशांनी भरलेली असते. त्यामुळे शिंद, गवडी व किवत येथील विद्यार्थ्यांना या बसमध्ये जागा होत नाही. किंबहुना बसमध्ये जागा नसल्याने बस येथे थांबत नाही. पर्यायाने विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सोसून खासगी वाहनांचा रस्ता धरावा लागतो. परंतु खासगी वाहने पुरेसे प्रवासी भरल्या शिवाय मार्गस्थ होत नसल्याने विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पोहचता येत नाही. तसेच दुपारची महुडे एसटी भोरहून सव्वाबाराला मार्गस्थ होते; परंतु शाळा सुटण्याची वेळ दुपारी साडेबाराची आहे. त्यामुळे मुलांना ही एसटी सापडत नसल्याने ताटकळत बसावे लागत असून खासगी वाहनांनी घरी परतावे लागत आहे. शेवटी मुलांच्या या रोजच्या त्रासाला कंटाळून ग्रामस्थांनी भोर आगाराच्या अधिकारी यांची भेट घेऊन शिंद येथून सकाळी सात व भोर येथून दुपारी एक वाजता एसटी सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन दिले.