पदपथाचे काम पदोपदी मंद गतीने
esakal September 14, 2025 04:45 PM

अमोल शित्रे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १३ ः डांगे चौक ते चिंचवड या मार्गाच्या विकासाच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा एक भाग असलेल्या पदपथाचे काम पदोपदी रखडल्याची स्थिती आहे. त्यामुळे पावलोपावली अडखळण्याचा धोका टाळण्यासाठी परिसरातील नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागते आहे.
उद््घाटनास सुमारे दीड वर्षे उलटूनही हे काम जेमतेम ४० टक्के पूर्ण झाले आहे. आता निर्धारित मुदतीत काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला पदोपदी आव्हान पेलावे लागेल. नागरिकांना पायाभूत सुविधा देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागांतर्गत अर्बन स्ट्रिटस्केप योजनेत हे काम सुरू आहे.
कोंडीची भर
अर्धवट कामामुळे या परिसरातील वाहतूक कोंडीत भर पडली आहे. याचा रहिवाशांना त्रास त्याचा होत आहे. अनेक ठिकाणी आधी केलेल्या कामांची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे ती ठिकाणे आधीच खराब झाली आहेत. त्यात नव्याने सुरू झालेली कामे नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.
डांगे चौक ते बिर्ला रुग्णालय या ३४.५ मीटर रुंदीच्या रस्त्यालगत पदपथ विकसित केले जात आहेत. या मार्गावर पदमजी पेपर मिलसारखा औद्योगिक प्रकल्प, बिर्ला रुग्णालय, पशू संवर्धन खात्याचे डेअरी फार्म, शाळा, महाविद्यालये तसेच व्यापारी व निवासी वसाहती आहेत. त्यामुळे हा रस्ता नेहमीच गजबजलेला असतो. दत्तनगर लेन ४ च्या पुढे नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्याचे काम सुरू आहे, परंतु त्याचा वेग अत्यंत मंद आहे. पदमजी पेपर मिलसमोरील पदपथाचे काम तुलनेने वेगात सुरू असून, त्यालगत खासदार श्रीरंग बारणे यांच्या निवासस्थानासमोर देखील काम प्रगतिपथावर आहे. मात्र, त्यापुढे डांगे चौकापर्यंत अजून कोणतीच कामे सुरू झालेली नाहीत.

------
मुली, महिला कामगारांना त्रास
डांगे चौक ते दत्तनगर परिसरात रात्री-अपरात्री कंपनी व शाळेच्या बस, टेम्पो, हायवा, ट्रक रस्त्यावर बेकायदा उभी केली जातात. अपघाताचा धोका असल्याने महिला, मुली, ज्येष्ठ नागरिक त्रस्त झाले आहेत. वाहनांच्या आडोशाला रात्री अवैध प्रकार घडतात. त्याचा महिला कामगार, महाविद्यालयीन मुली व ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.
---
पदपथ मोठ्या लोकांसाठीच ?
दत्तनगर लेन १ ते ४ या लोकवस्तीच्या दर्शनी भागात पदपथाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. इतर निवासी भागांतील कामाचा वेग संथ आहे. हेच खासदार निवास, कंपनी आणि बिर्ला रुग्णालय अशा ठिकाणची कामे वेगाने मार्गी लावली जात आहेत. स्थानिक नागरिकांनी हा दुजाभाव का, पदपथ केवळ मोठ्या लोकांसाठीच आहेत का, अशा प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
---
प्रकल्प थोडक्यात...
- कामाची सुरवात : मार्च २०२४
- पूर्णत्वाची मुदत : मार्च २०२६
- एकूण खर्च : २४ कोटी ९९ लाख
- रस्त्याची लांबी व रुंदी : २ किमी लांब, ३४.५ मीटर रुंद
- कामाची सद्यःस्थिती : काम ४०% पूर्ण
------

सुविधा...
- अर्बन स्ट्रिटस्केप डिझाईनचे पदपथ
- सायकल ट्रॅक
- पादचाऱ्यांसाठी चालण्याची सोय
- बसण्याची व्यवस्था
- स्मार्ट पथदिवे
- विरंगुळ्याची ठिकाणे
- झाडांची लागवड
------

पादचाऱ्यांना अडथळे
- खोदलले खड्डे
- मुरमाचे ढीग


- खडीचे ढीग
- पेव्हर ब्लॉक
- अर्धवट कामे
- वाहतूक कोंडी
----------
काम रखडण्याची कारणे
- थेरगाव फाटा येथे समतल विलगकाचे (ग्रेड सेपरेटर) नियोजन सुरू
- ग्रेड सेपरेटरसाठी आवश्यक स्टॉर्म वॉटर लाईन (पावसाळी पाणी वाहून नेणारी वाहिनी) टाकण्याची जागा मर्यादित
- या वाहिनीसाठी पशुसंवर्धन विभागाची जमीन महापालिकेला आवश्यक
- जागा हस्तांतरित करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घेण्याची प्रक्रिया वेळखाऊ
- ग्रेड सेपरेटरचे काम सुरू झाल्यास पदपथाच्या कामात आणखी अडथळा येणार
- विकसित पदपथ पुन्हा खोदण्याची वेळ येऊ नये म्हणून काम अगोदरच पूर्ण करणे अनिवार्य
-----

दीड-दोन वर्षांपासून पदपथाचे काम अर्धवट आहे. जुन्या पदपथावर चालता येत होते, पण आता रस्त्यावरून चालताना अपघाताचा धोका आहे. चालण्यासाठी जागाच नाही.
- विजय जाधव, थेरगाव
-----
पदपथाच्या कामामुळे रात्री मोठी वाहने रस्त्यावर उभी असतात. रस्त्यावरून चालताना अपघाताचा धोका असल्याने बसथांब्यावर उतरल्यानंतर वाहनांच्या बाजूने जावे लागते. अनेक वाहनांच्या बाजूला गैरप्रकार सुरू असतात. गुन्हेगारी प्रवृत्तींचा सामना करण्याच्या भीतीने थरकाप उडतो.
- पल्लवी पवार, थेरगाव
------
डांगे चौक ते बिर्ला रुग्णालय रस्त्यावरील वाढती वाहन संख्या पाहता डांगे चौकातील ग्रेड सेपरेटर थेरगाव फाट्यापर्यंत विस्तारण्याचे नियोजन आहे. जर हे काम हाती घेतले, तर थेरगाव बाजूचा विकसित पदपथ खोदावा लागेल. ही वेळ येऊ नये म्हणून पशुसंवर्धन विभागाच्या जागेतून स्टॉर्म वॉटर लाईन टाकण्याचा पर्याय आहे. ही कामे प्राधान्याने पूर्ण करावी लागणार असल्याने पदपथाच्या कामाला थोडा विलंब होईल. पण, नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.
- सुनील पवार, कार्यकारी अभियंता, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
----------

फोटो
49298

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.