आशिया कप सुरू आहे, उद्या आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान आमने-सामने आहेत. मात्र या सामन्याला अनेकांकडून विरोध केला जात आहे. भारतानं पाकिस्तानसोबत क्रिकेटचा सामना खेळू नये असं भारतामधील अनेक क्रिकेट चाहात्यांचं मत आहे, मात्र या सामन्याला भारत सरकारने परवानगी दिल्यानं हा सामना होणार आहे. दरम्यान दुसरीकडे मात्र या सामन्यावरून महाराष्ट्रात राजकारण चांगलंच तापलं आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गटानं आक्रमक भूमिका घेतली आहे.
पहलगाम हल्ला झाला, त्यानंतर दोनच महिन्यांमध्ये तुम्ही पाकिस्तानसोबत क्रिकेट कसं खेळू शकता असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. आशिया कपमध्ये ८ देश सामिल होतात. ऑलिम्पिकमध्ये सर्व जग सहभागी असतं. 1980 मध्ये मॉस्कोमध्ये ऑलिम्पिक होतं. रशियाने अफगाणिस्तानात फौज उतरवली होती, म्हणून अमेरिकेने ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकला होता, असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान या सामन्याला शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार विरोध होत आहे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी देखील इशारा दिला आहे. भारत पाकिस्तान मॅच स्क्रीनवर दाखवणाऱ्या हॉटेल्समधील स्क्रीन बॅटने फोडणार, असं शरद कोळी यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणले शरद कोळी?
भारत पाकिस्तान मॅच स्क्रीनवर दाखवणाऱ्या हॉटेल्समधील स्क्रीन बॅटने फोडणार, असा इशारा शरद कोळी यांनी हॉटेल चालकांना दिला आहे. हातात बॅट घेत शरद कोळी यांनी हॉटेल चालकांना हा इशारा दिला आहे. भारतातील माता भगिणींच्या कपाळाचं कुंकू पुसणाऱ्या पापी आणि नीच पाकिस्तान सोबत भारताची मॅच होणार आहे. महाराष्ट्रातील हॉटेल चालक मालकांचे हिंदुस्थानावर प्रेम असेल तर भारत पाकिस्तान मॅच स्क्रीनवर कोणीही दाखवणार नाही. जर कोणी स्क्रीनवर मॅच दाखवण्याचा प्रयत्न केला, तर ती स्क्रीन फोडून टाकणार. त्याला हॉटेल मालक जबाबदार असणार असं शरद कोळी यांनी म्हटलं आहे, दरम्यान आता उद्या हा मुद्दा चांगलाच तापण्याची शक्यता आहे.