अंकुशनगर (जि. जालना) - ‘ओबीसी चळवळीत काम करणाऱ्यांना परदेशात पाठविण्याची मनोज जरांगे यांची भाषा योग्य नाही, असे वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले होते. यावर ‘तुम्ही कोणाची बाजू घेता हे तुमच्या लक्षात आले पाहिजे. आम्ही तुम्हाला काहीही बोललेलो नाही. तुम्ही त्यांची बाजू घ्यायला तुमची कुठे त्यांना माया येते,’ असा सवाल जरांगे यांना वडेट्टीवार यांना केला.
अंकुशनगर येथील निवासस्थानी मनोज जरांगे यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, की आम्ही सरकारला कळवले आहे, की मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय नको. छगन भुजबळांचे ऐकून मुलांवरील अन्याय आम्ही सहन करणार नाही. आम्ही त्यांना सांगितले की यावर तातडीने निर्णय घ्या. सरकारने निर्णय घेतला नाही, तर त्याचे परिणाम भोगावे लागतील.’
मराठा समाजाच्या दहा टक्के आरक्षणावर सुनावणी झाली. यावर बोलताना ते म्हणाले, की आयोगाने सर्व्हे केला आहे. अहवाल दिले आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाने सर्व्हे केला आहे. मराठ्यांना दहा टक्के आरक्षण दिले. ते ५० टक्क्यांवर गेले म्हणून उडणार आहे.
मागासवर्गीय आयोगाचे निकष आहेत, की जी जात मागास सिद्ध होईल तिला ५० टक्क्यांच्या आत ओबीसी आरक्षणात घ्यावे लागते. अशा जातीला तुम्ही ५० टक्क्यांबाहेर आरक्षणात घेता. त्यामुळे ते आरक्षण टिकतच नाही. म्हणूनच ते दहा टक्के आरक्षण ५० टक्क्यांच्या आत ‘ओबीसी’त द्या, असे आमचे म्हणणे आहे.