- संतोष भिंगार्डे
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये वेगवेगळ्या संकल्पना आणि कथाबीज असलेले चित्रपट येत आहेत. त्यातील वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. ‘बिन लग्नाची गोष्ट’ या आधुनिक विचारसरणीचा आणि कौटुंबिक नातेसंबंधाची चौकट मोडणारा असा चित्रपट आहे. दिग्दर्शक आदित्य इंगळेने या चित्रपटातून एक नवीन विचार मांडलेला आहे.
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका जोडप्याची ही कथा आहे. आशय (उमेश कामत) आणि ऋतिका (प्रिया बापट) हे एक आधुनिक विचारसरणीचे जोडपे. दोघांचे एकमेकांवर जिवापाड प्रेम असते; परंतु लग्न न करताच ते लंडनमध्ये लिव्ह इनमध्ये राहात असतात. आशय हा सरळ आणि साध्या स्वभावाचा तरुण असतो तर ऋतिका स्वावलंबी आणि काहीशी कठोर स्वभावाची तरुणी असते. आता ऋतिका आठ महिन्यांची गरोदर असते आणि गरोदरपणातही ती आपले कामकाज कसेबसे करीत असते. त्यातच आशयच्या पायाला दुखापत होते आणि मग साहजिकच या जोडप्याला कुणाच्या तरी मदतीची गरज भासते. मग एखादा मदतनीस मिळावा, याकरिता ते शोधाशोध करीत असतात. अशातच एके दिवशी आशयला माधव तांबे (डॉ. गिरीश ओक) यांच्याबद्दल समजते. माधव तांबे हे आपला व्यवसाय सांभाळून एकांतात जीवन जगणाऱ्या माणसांना मदतीचा हात देत असतात. साहजिकच आशयच्या सांगण्यावरून ते आशयला भेटण्यासाठी त्याच्या घरी येतात. त्या वेळी माधव यांच्याबरोबर उमा (निवेदिता सराफ) देखील असतात. उमा नुकत्याच भारतातून लंडनमध्ये आलेल्या असतात. ते आशय आणि ऋतिकाची भेट घेतात आणि कथानकाला वेगळे वळण मिळते.
दिग्दर्शक आदित्य इंगळेने ही कथा मांडताना त्याला भावभावनांची उत्तम गुंफण केली आहेच. शिवाय, त्याला प्रेमाचा आणि आपुलकीचा चांगलाच गोडवा दिला आहे. हळवा आणि मायेचा ओलावा जपणारा असा हा चित्रपट आहे. आजच्या आधुनिक युगातील एक पिढी आणि एक जुनी पिढी यांच्यातील आचारविचार, त्यांच्यातील संघर्ष छान टिपला आहे. नात्यांमधील एक वेगळा आणि नवा दृष्टिकोन देणारा असा हा चित्रपट आहे. उमेश कामत आणि प्रिया बापट हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक आदर्श जोडपे. त्यांनी यापूर्वीही एकत्रित काम केले आहे आणि या चित्रपटातही त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. परखड आणि स्पष्टवक्ती अशी ऋतिकाची भूमिका प्रियाने उत्तम वठविली आहे. विशेष बाब म्हणजे, माधव तांबेंची भूमिका डॉ. गिरीश ओक यांनी कमालीची साकारली आहे. समंजस आणि समजूतदार तसेच हजरजबाबी अशी ही भूमिका त्यांनी कमालीची उभी केली आहे. सुकन्या मोने आणि संजय मोने यांनी आशयच्या आई-वडिलांची भूमिका साकारली आहे.
परदेशातील नयनरम्य दृश्ये सिनेमॅटोग्राफर्सने आपल्या कॅमेऱ्यामध्ये छान टिपलेली आहेत. चित्रपटातील काही संवाद दमदार आहेत; मात्र चित्रपटाचा पूर्वार्ध काहीसा संथ झालेला आहे. उत्तरार्धात कथानक चांगलाच वेग घेणारे झाले आहे. दोन पिढ्यांतील आचारविचार, त्यांच्यातील संवाद तसेच पारंपरिक लग्नाच्या चौकटीपेक्षा एकमेकांचा सहवास, एकमेकांची गरज आणि भावभावना समजून घेणे किती आवश्यक आहे, हे सांगणारा चित्रपट आहे. आधुनिक नात्याचा नवा दृष्टिकोन देणारा हा चित्रपट आहे.
- तीन स्टार