91214
सतरा दिवसांच्या गणरायांना
सावंतवाडीत भक्तिमय निरोप
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ ः शहरातील १७ दिवसांच्या गणरायाला ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशी साद घालत वाजतगाजत निरोप देण्यात आला. गणेशभक्तांच्या जल्लोषात लाडक्या गणरायांचे काल (ता. १२) थाटामाटात विसर्जन करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक नृत्य व पालखीतून निघालेली बाप्पांची विसर्जन मिरवणूक खास आकर्षण ठरली.
शहरात १७ दिवसांच्या गणपतींचे उत्साहात विसर्जन करण्यात आले. देव नरसोबा गणेशोत्सव मंडळ, जुना बाजार व भट्टीवाडा सावंतवाडी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणरायाला रात्री उशिरा निरोप देण्यात आला. दरवर्षीप्रमाणे पालखीतून निघालेली मिरवणूक खास आकर्षण ठरली. वारकरी भजन, समई नृत्य विसर्जन मिरवणुकीत लक्षवेधी ठरले. युवाई डीजे, ढोल पथकाच्या तालावर थिरकताना दिसली. महिला व युवकांच्या कार्यक्रमांनी सर्वांचेच लक्ष वेधले. काही घरगुती गणपतींनादेखील फटाक्यांच्या आतषबाजीसह निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला होता. गणरायांना निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने गणेशभक्त मोती तलावाच्या काठी उपस्थित होते.