विद्यार्थांचे भवितव्य टांगणीला
पालघर, ता. १३ ः पालघर जिल्हा परिषदेमध्ये २०१७ पासून मराठी माध्यमाच्या शिक्षकपदांची रिक्त पदे आहेत. त्यामुळे जिल्ह्याबाहेर बदली करून जाणारे शिक्षकांसह विकल्पाने बदली घेणाऱ्या शिक्षकांना सोडू नये, असा ठराव जिल्हा परिषदेने घेतला होता; मात्र जिल्हा परिषदेने ४०४ आंतरजिल्हा तर २२१ शिक्षकांना विकल्पने सोडल्यामुळे अठरा टक्के रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागणार आहे.
पालघर जिल्ह्यामध्ये ४०४ शिक्षक यांनी आंतरजिल्हा बदलीचे प्रस्ताव दिले होते. तर ठाणे पालघर जिल्हा विभाजनानंतर ठाणे जिल्ह्यात जाणाऱ्या विकल्प बदलीच्या २२१ शिक्षकांनी बदलीसाठी प्रस्ताव दिले होते; पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी नवीन भरतीपर्यंत कोणताही शिक्षक सोडू नये, असा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला होता. या बदली प्रक्रिया थांबल्याने शिक्षकांनी निवेदने, आंदोलने केली. यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर बदली प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली. त्यानंतर ६२५ शिक्षकांनी दोन वेगवेगळ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केल्या. या वेळी न्यायालयाने मानवी हक्क, मूल्यांचा विचार करून शिक्षकांना सोडावे, असे आदेश दिले. या आदेशाचे आधार धरून आंतरजिल्हा बदल्यातील ४०४ शिक्षकांनाही सोडले गेले. तर आंतरजिल्हा बदलीचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगण्यात येते.
------------------------------------------
शिक्षकांची संख्या
मानधनावर - ५८७
कंत्राटी - ४८०
रिक्त पदे - १,१५५
टक्केवारी - १७.९०
-----------------------------
साडेसात लाख विद्यार्थ्यांना फटका
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात मराठी माध्यमातील शिक्षकांची ६,३४२ पदे मंजूर असताना सर्वाधिक १,१५५ पदे रिक्त आहेत. २०२४-२०२५च्या संच मान्यतेनुसार गृहित धरलेली आहेत. पालघर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सहावी ते आठवी इयत्तासाठी लागणारे विज्ञान गणिताचे पदवीधर विषय शिक्षक यांचीही रिक्त पदांची संख्या मोठी आहे. जिल्हा परिषदेला हे विषय शिक्षक मिळत नसल्यामुळे रिक्त पदांची संख्या ४५० इतकी आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सुमारे साडेसात लाख विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होणार आहे.
-----------------------------------
मुंबई उच्च न्यायालयाने मानवी मूल्यांचा आधार घेऊन शिक्षकांना सोडावे, असे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेने शिक्षकांना सोडले असून त्यांना पालघर जिल्हा परिषदेतून कार्यमुक्त केले आहे.
- सोनाली मातेकर, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जि.प. पालघर