आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होत आहे. या सामन्यावरून वादाची ठिणगी पडली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही संघ भिडणार आहेत. असं असताना सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. विरोधकांनी या सामन्याप्रकरणी ठिकठिकाणी आंदोलनं सुरु केली आहेत. असं असताना एकेकाळी भारत पाकिस्तान वादावर परखड मत मांडणाऱ्या प्रशिक्षक गौतम गंभीरची काय प्रतिक्रिया आहे? याकडे लक्ष लागलं होतं. त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ‘भारत पाकिस्तान यांच्यात सामना होऊच नये. सीमेवर दहशतवाद थांबत नाही तोपर्यंत काहीच होऊ नये. पण हा निर्णय सरकारचा असेल.’ असं विधान करणारा गौतम गंभीर सध्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. त्यामुळे त्याचं म्हणणं काय आहे याकडे लक्ष लागून होतं. भारताचे सहाय्यक प्रशिक्षक रयान टेन डोशेट यांनी गौतम गंभीर काय म्हणाला याबाबत स्पष्टीकरण दिलं.
भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी ड्रेसिंग रुममध्ये कसं वातावरण आहे? असा प्रश्न पत्रकार परिषदेत रयान टेन डोशेट यांना विचारला गेला. तेव्हा त्यांनी सांगितलं की, गौतम गंभीरने संघाला सामन्यावर लक्ष्य केंद्रीत करण्यास सांगितलं आहे. रयाने म्हणाले की, ‘आम्हाला माहिती आहे की देशात कसं वातावरण आहे. गौतम गंभीरचा स्पष्ट मेसेज आहे की, येथे प्रोफेशनल पद्धतीने राहावं लागेल. तसेच भावनिक गोष्टी वेगळ्या ठेवाव्यात. आमच्यासमोर जो खेळ आहे त्यावर फोकस करणं गरजेचं आहे. प्रत्येकाचं मत वेगळं असेल पण संघाचं लक्ष्य फक्त क्रिकेटवर असावं. हे संवेदनशील प्रकरण आहे. आशिया कप गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय होता. एक वेळ आम्ही विचार केला होता की येणार नाहीत. पण आपण येथे आहोत आणि खेळाडूंना भावना बाजूला ठेवून काम करावं लागेल. ‘
टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक रयान डोशेट यांनी स्पष्ट केलं की बीसीसीआय आणि सरकारच्या सूचनांचं पालन करत आहोत. ‘तुम्ही या गोष्टीवर चर्चा करू शकता की खेळ आणि राजकारण वेगळं ठेवलं पाहीजे. सगळ्यांचं मत वेगवेगळं असू शकतं. आता आम्ही बीसीसीआय आणि सरकारचं म्हणणं ऐकत आहोत. आशा आहे की, आम्ही तसंच खेळू. त्यातून आम्हाला देशाप्रती काय वाटतं हे दाखवून देऊ.‘