नाशिक: आगामी महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली असून, अधिकाधिक जागा निवडून आणण्याच्या अनुषंगाने विभागनिहाय बैठका सुरू करण्यात आल्या आहेत. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्याचे आवाहन शहराध्यक्ष तथा ‘म्हाडा’चे सभापती रंजन ठाकरे यांनी केले.
मध्य नाशिक विभागाची बैठक वडाळा रोड येथील मन्नत लॉन्स येथे पार पडली. त्या वेळी ठाकरे बोलत होते. या वेळी प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, निवृत्ती अरिंगळे, योगिता आहेर, संजय खैरनार, सलीम शेख, हाजी पहिलवान, मनोहर कोरडे, संतोष शेळके, दत्ता पाटील, मुख्तार शेख, धनंजय निकाळे, डॉ. हेमलता पाटील, नितीन चंद्रमोरे आदी व्यासपीठावर होते. ठाकरे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. अंतिम प्रभागरचना व आरक्षणाचा निर्णय सप्टेंबर महिन्यात होईल.
निवडणुकीची प्रशासकीय तयारी सुरू झाल्याने निवडणुका अटळ आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात प्रवेश होत आहेत. पक्षाची ताकद वाढत असल्याने निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्यास मदत होईल.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात केलेल्या विकासाचे रोल मॉडेल तसेच मंत्री छगन भुजबळ नाशिक जिल्ह्यात करत असलेल्या विकासाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून विधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून आणले.
याच पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाचे उमेदवार निवडून आणण्याची तयारी करावी. पदाधिकाऱ्यांनी ताकदीनिशी निवडणुकीला सामोरे जावे. इच्छुक उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार, प्रसार करावा. उमेदवारांनी आपली ताकद आणि तयारी अतिशय प्रभावीपणे करावी आणि जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करावे लागणार असल्याचे ते म्हणाले.
Sharad Pawar : महाराष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी जातीपातीचे राजकारण थांबवावे: शरद पवारया वेळी जहीर शेख, योगेश दिवे, हाजी इस्माईल, अल्ताफ शाह, युवराज पांडे, साजिद मुलतानी, सलीम पठाण, सुलेमान सय्यद, शरीफ शेख, जय कोतवाल, दादा कापडणीस, श्रीकांत काळे, गणेश पेलमहाले, प्रकाश पवार आदी उपस्थित होते.