Success Story:'ऊसतोड करणाऱ्या युवकाची कार्यकारी अभियंतापदाला गवसणी'; देलवडीतील शेलार यांचे यश: पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण केलेला घरकुल प्रकल्प ठरला मैलाचा दगड
esakal September 16, 2025 04:45 AM

खुटबाव: देलवडी (ता. दौंड) येथील भाऊसाहेब शेलार यांनी शालेय जीवनामध्ये ऊस तोडणी व उसाची लागण करत शिक्षण घेतले. कंदील व दिव्याच्या उजेडावर अभ्यास केला. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत कनिष्ठ अभियंतापद मिळवले. प्रामाणिकपणे काम करत पुणे महानगरपालिकेमध्ये कार्यकारी अभियंतापदावर मजल मारली आहे. लवकरच त्यांना अधीक्षक अभियंतापद मिळणार आहे. पुणे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२३ मध्ये लोकार्पण केलेली २८५८ घरकुले बांधणे हा प्रकल्प शेलार यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरला.

Smart Meter: मीटरचा हिशोब ‘स्मार्ट’ की फसवा?; वाढीव वीजबिलांमुळे ग्राहक संतप्त, दुरुस्तीसाठी महावितरण कार्यालयात रांगा

आई वत्सला व वडील श्रीरंग यांनी ऊस तोडणी व मजुरीची कामे करत भाऊसाहेब यांना शिक्षण दिले. त्यांचे प्राथमिक शिक्षण देलवडी येथे झाले. माध्यमिक शिक्षण घरापासून आठ किलोमीटर अंतरावर नाथाची वाडी येथे पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी बारामती येथे राधेश्याम अग्रवाल कॉलेजला सायन्स टेक्निकल महाविद्यालय प्रवेश घेतला. त्यानंतर शिवनगर विद्या प्रसारक मंडळ माळेगाव येथे सिव्हिल डिप्लोमा पूर्ण केला. दरम्यान, पुणे महापालिकेमध्ये अभियंतापदाची जाहिरात सुटली व चांगले गुण असल्याने नोकरी मिळाली.

अभियंत्यांचे गाव....

भाऊसाहेब शेलार यांच्या कुटुंबामध्ये १५ अभियंते आहेत. विशेष म्हणजे ३५०० लोकसंख्या असणाऱ्या देलवडी गावामध्ये १८९ अभियंते आहेत. यापैकी अनेक अभियंत्यांनी आपले कर्तृत्व सातासमुद्रापार नेले आहे. याचे सर्वस्वी श्रेय शेलार व जुन्याजाणत्या अभियंत्यांना जाते.

आनंदाची बातमी! 'गायीच्या दूध दरात तीन रुपयांपर्यंत वाढ'; सातारा जिल्ह्यात सुमारे ५५ हजार दूध उत्पादकांना दिलासा

पुणे महानगरपालिकेत काम करताना अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज उभारणे, चतुःशृंगी, गणेश खिंड व पाषाण परिसरात पिण्याचे पाणी नियमित करणे. भूसंपादन करत रस्ते मोकळे करणे, पुण्यातील २७७ उद्यानांची देखभाल करणे,२८५८ गरीब कुटुंबांना घर मिळवून देणे, अनधिकृत बांधकाम पाडणे ही कामे केली. हे करताना प्रामाणिकपणा चिकाटी, निर्भीडपणे जोपासला. या यशामध्ये कुटुंबीय व देलवडीकरांचे योगदान आहे.

- भाऊसाहेब शेलार, कार्यकारी अभियंता

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.