गुहागरवासीय करणार किनाऱ्याची स्वच्छता
esakal September 16, 2025 06:45 AM

-rat१४p२४.jpg-
२५N९१४७६
गुहागर ः येथील किनाऱ्यावर स्वच्छता दिवसानिमित्त स्वच्छता मोहिमेचे नियोजन करण्यासाठी आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण, भाऊ काटदरे आदी.
----
गुहागरवासीय करणार किनाऱ्याची स्वच्छता
नियोजनासाठी बैठक ; सात विभागात प्रत्येकी ५० जणांचे पथक
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. १५ ः गुहागरमध्ये येणाऱ्या पर्यटकांना स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा अनुभवायला मिळावा यासाठी गुहागरवासीयांनी समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करण्याचा संकल्प केला आहे. ही मोहीम आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनी राबवण्यासाठी श्रीदेव व्याडेश्वर सभागृहात शहरवासीयांच्या उपस्थितीत नियोजन करण्यात आले.
गुहागर नगरपंचायतीतर्फे नियोजन बैठकीचे घेण्यात आली. २० सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी गुहागर शहरवासीयांनाबरोबर घेऊन स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या नियोजनासाठी श्री व्याडेश्वर देवस्थान सभागृहात झालेल्या बैठकीवेळी सह्याद्री निसर्ग मित्र भाऊ काटदरे, मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण उपस्थित होते. याप्रसंगी प्रवीण जाधव, सुनील नवजेकर, सचिन जाधव, लायन्स क्लबचे अध्यक्ष सचिन मुसळे, संतोष वरंडे, शामकांत खातू, मयुरेश पाटणकर, माजी नगराध्यक्ष स्नेहा वरंडे, बचत गटाच्या प्रमुख पालशेतकर, पराग मालप, श्रीधर बागकर आधी उपस्थित होते. यावेळी गुहागर समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करण्याचे नियोजन करण्यात आले. किनारा स्वच्छतेसाठी ७ विभाग पाडण्यात आले आहेत. त्यामध्ये पाच माड परिसर ते पिंपळादेवी मंदिर, दुर्गादेवी मंदिर ते भोसले गल्ली, भोसले गल्ली ते रामेश्वर स्मशानभूमी, रामेश्वर स्मशानभूमी ते बाजारपेठ, बाजारपेठ ते किस्मत आणि किस्मत ते खालचा पाठ अशा सात विभागांचा समावेश आहे. त्या प्रत्येक विभागाला स्वच्छता दूत नेमण्यात आला आहे. त्याच्याबरोबर प्रत्येक विभागात नगरपंचायत कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, बचत गटाचे सदस्य असा ५० जणांचा ग्रुप असेल. अशा नियोजनबद्ध स्वच्छता मोहीम राबविण्याचे निश्चित केले असून त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन करण्यात आले.
----
कोट
गुहागर शहराची सुंदरता, स्वच्छता राखणे प्रत्येकाच्या हाती आहे. आपला परिसर अधिक निसर्गरम्य कसा ठेवता येईल, याकडे प्रत्येकाने लक्ष दिले पाहिजे. तसे झाले तर यावर्षी गुहागर किनारी कासव महोत्सव राबवण्याचे नियोजन करता येईल.
-भाऊ काटदरे, सह्याद्री निसर्ग मित्र

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.