नवी दिल्ली : ‘‘निवडणूक आयोगाने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीचे आदेश द्यायला हवे होते,’’ असे मत माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी व्यक्त केले. ‘डेमोक्रसीज हार्टलँड’ या नव्या पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत कुरेशी बोलत होते. ३० जुलै २०१० ते १० जून २०१२ या कालावधीमध्ये कुरेशी मुख्य निवडणूक आयुक्त होते.
कुरेशी म्हणाले, ‘‘आरोप करताना राहुल गांधी यांनी वापरलेले शब्द राजकीय आहेत. त्यांच्यावर या शब्दांवरून टीकाही होत आहेत. मात्र, ते ज्या तक्रारी करत आहेत त्यांची तपशीलवार चौकशी होणे आवश्यक आहे. बिहारमधील मतदारयाद्यांच्या फेरनिरीक्षणाच्या एकूणच कार्यपद्धतीबद्दल प्रचंड आक्षेप आहेत. निवडणूक आयोगाने यापूर्वी मतचोरीचे सर्व आरोप फेटाळले आहेत. बिहारमधील कायद्यानुसार मतदानासाठी पात्र असलेल्यांचा समावेश करतील, असेही आयोग नेहमीच सांगत आला आहे. मात्र, ही प्रक्रिया खरोखरीच पारदर्शी होते का ते पाहणे आवश्यक आहे.
जेव्हा मी निवडणूक आयोगावर कोणतीही टीका ऐकतो, तेव्हा मला केवळ एक भारतीय नागरिक म्हणूनच नव्हे तर माजी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणूनही खूप काळजी वाटते. मला या टीकेवरून वाईटही वाटते. जेव्हा मी निवडणूक आयोग या स्वतंत्र यंत्रणेवर टीका होताना पाहतो तेव्हा मला ही यंत्रणा कमकुवत तर होत नाही ना, अशी काळजी वाटू लागते. निवडणूक आयोगाने स्वतः आत्मपरीक्षण केले पाहिजे आणि काळजी घेतली पाहिजे. मी नेहमीच विरोधी पक्षांच्या मताला प्राधान्य दिले. सत्तेवर असलेल्या पक्षाचे विरोधकांइतके लाड करण्याची गरज नाही, कारण विरोधी पक्ष सत्तेबाहेर आहे, हे कायम लक्षात ठेवायला हवे.’’
मी मुख्य निवडणूक आयुक्त असताना विरोधकांना भेटीची वेळ हवी असेल, तर त्यांच्यासाठी माझ्या कार्यालयाचे दरवाजे कायम उघडे होते. त्यांना छोटीशी जरी मदत हवी असेल, तर ती करण्याची माझी तयारी असे. येथे विरोधकांना वेळोवेळी सर्वोच्च न्यायालयात जावे लागते आणि भेटीची वेळ मागावी लागत आहे. निवडणूक आयोगाने राहुल गांधी प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगण्याऐवजी गांधींच्या आरोपांची चौकशी करायला हवी होती.
- एस. वाय. कुरेशी, माजी मुख्य निवडणूक आयुक्त