तळेगाव स्टेशन : तळेगाव एमआयडीसीमधील एका विचित्र प्रकारात पिस्तुलाने केलेली स्टंटबाजी दोन मित्रांना भोवली. दोघे परप्रांतीय कंत्राटी कामगार असून, मित्रही आहेत. एकाने झुडपात लपविलेले पिस्तूल दुसऱ्याने हातात घेतले. त्याच्याकडून ट्रीगर दाबला गेल्याने दुसरा मित्र जखमी झाला.
एमआयडीसीतील टप्पा क्रमांक दोन मधील मिंडेवाडी (ता. मावळ) शिवारात शनिवारी रात्री हा प्रकार घडला. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार शंकर पाटील यांनी फिर्याद दिली. यात बेकायदा पिस्तूल बाळगलेल्या आणि जखमी झालेल्या आरोपीचे नाव विजयकुमार असे आहे, तर त्याच्या पिस्तुलाने स्टंटबाजी केलेल्याचे नाव मंजरीन रजिफ मिया असे आहे. हे भाड्याच्या खोलीत एकत्र राहतात.
ते कंपनीतून कामावरून घरी परत जात होते. विजयकुमारने रस्त्याच्या बाजूला झुडपात लपवून ठेवलेली पिस्तूल मंजरीनने हातात घेऊन स्टंटबाजी सुरु केली. ट्रिगर दाबला गेल्याने सुटलेली गोळी विजयकुमारच्या पोटात गेली. विजयकुमार तेव्हा मोबाईलवर बोलत चालत होता. या प्रकाराची वाच्यता होऊन नये म्हणून सोबतच्या मित्रांसह मंजरीनने विजयकुमारला खोलीवर नेले. त्यानंतर उपचारासाठी तो त्याला घेऊन तळेगावला आला.
पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला. बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी विजयकुमार (वय २८, मुळ रा. चकीया, जि. मोतिहारी, बिहार) याच्यावर शस्त्र कायद्याच्या ३ (२५) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मंजरिन रजिफ मिया (वय २४, मूळ रा. नरकटीया, ढरपा, जि. मोतिहारी, बिहार) याच्यावर निष्काळजीपणाबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित जाधव करीत आहेत.
गोळीबाराच्या आवाजाने वाचा फुटलीगोळीबाराच्या आवाजाने या परिसरात चर्चेला उधाण आले होते. त्यामुळे एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चौकशीनंतर पोलिसांनी मंजरिनला ताब्यात घेतले. आधी त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पिस्तुलातून गोळीबार करून आम्हाला लुटल्याचा बनाव त्याने केला, मात्र पोलिसांना संशय आला. पोलिसी खाक्या दाखविताच मंजरीनने गवतात लपवलेली पिस्तूल दाखवत कबुली दिली.