महागड्या केबलची जेएनपीएतून चोरी
उरण (वार्ताहर) ः जेएनपीए पोर्टमधील तब्बल अकरा लाखांपेक्षा जास्त किमतीची विद्युतवाहिनी चोरण्यात आली आहे. या घटनेमुळे प्रकल्पाच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जेएनपीए पोर्टमधील बीएमसीटी फेज-२ येथे अटेलिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे विद्युत वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. कामासाठी केबल्सचा साठा बीएमसीटी फेज-२ मधील उपकेंद्र चारजवळील मोकळ्या जागेत ठेवण्यात आला होता. त्यापैकी एका ड्रममधून १३५ मीटर लांबीची ११ लाख ६१ हजारांची केबल चोरण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच कंपनीच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे कायदेशीर तक्रार दाखल केली आहे.