सीबीएसई शाळेची घंटा यंदाही वाजणार नाही
esakal September 16, 2025 04:45 AM

उच्च शिक्षणाचे स्वप्न दुभंगले
मिरा-भाईंदर पालिकेची सीबीएसई शाळा पुढील वर्षी
भाईंदर, ता. १४ (बातमीदार) : सीबीएसई बोर्डाची शाळा सुरु करण्यासाठी मिरा-भाईंदर पालिकेने निविदेद्वारे खासगी शैक्षणिक संस्थांकडून देकार मागवले होते, मात्र पालिकेच्या धोरणाशी सुसंगत नसल्याने यंदाही सीबीएसई बोर्डाची शाळा सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले.
गरीब घरातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देता यावे, यासाठी महापालिकेने सीबीएसई बोर्डाची शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून शाळा सुरू होणे अपेक्षित होते मात्र त्यासंदर्भात ठोस हालचाली झाली नसल्याने यंदा प्रशासनाने शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न सुरू केले. शाळा सुरू करण्यासंदर्भातील धोरण निश्चित झाल्याने निविदा प्रक्रिया सुरू करण्यात उशीर झाला. जूनमध्ये धोरण निश्चित झाल्यानंतर प्रशासनाने निविदा प्रक्रिया सुरू करण्यासाठी खासगी शाळांकडून देकार मागवले, परंतु शैक्षणिक वर्षाचे तीन महिने संपल्यानंतरही निविदा मंजूर झाली नाही. त्यामुळे यंदाही सीबीएसई शाळा सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
-------------------------------------
करारातील मुख्य तरतुदी
-सीबीएसई शाळा खासगी शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून चालवण्याच्या दृष्टीने तयार केलेल्या धोरणानुसार शाळा चालवणाऱ्या संस्थेला पालिकेकडून प्रत्येक विद्यार्थ्यामागे शैक्षणिक शुल्क दिले जाणार आहे.
- शुल्कात दुसऱ्या वर्षापासून महागाई दरानुसार वाढ केली आहे. प्रति विद्यार्थी शुल्क किती असावे यासाठी खासगी शैक्षणिक संस्थांकडून निविदा मागवण्यात आल्या. याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही उपक्रमासाठी पालिकेकडून संस्थेला निधी उपलब्ध दिला जाणार नाही.
- शाळेसाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या घेण्याची जबाबदारी पालिकेवर असणार आहे. प्रयोगशाळा, संगणक कक्ष, वाचनालय, गणवेश, पाठ्यपुस्तके, तसेच अन्य शैक्षणिक साहित्य सुविधा पालिकेकडून संस्थेला उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
------------------------------
महापालिकेने काढलेल्या निविदेतील अटी-शर्तीनुसार निविदा नसल्याने त्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे फेरनिविदा काढण्यात आली आहे. त्यानुसार सीबीएसई शाळा पुढील वर्षी सुरू केली जाईल.
- राधाबिनोद शर्मा, आयुक्त, मिरा-भाईंदर महापालिका

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.