पालघर, ता. १६ (बातमीदार) : राज्यात १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यक्षमता वाढवून गावोगावात विकासाची गंगा पोहोचवणे आणि लोकाभिमुख प्रशासन अधिक सक्षम करणे, हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे. सर्वोत्तम काम करून गावोगावात विकासाचे नवे शिखर गाठण्याची ही सुवर्णसंधी आहे. फक्त बक्षीस मिळविण्यासाठी नव्हे, तर गावाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा. पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी एकजुटीने काम करून विभागस्तरीय तसेच राज्यस्तरीय बक्षिसे मिळवावीत आणि जिल्ह्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात उज्ज्वल करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी केले आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानानिमित्त उद्या (ता. १७) एकाच वेळी पालघर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहे. तालुक्यातील किमान एका ग्रामसभेला आमदार उपस्थित राहणार असून, गावातील स्थानिक लोकप्रतिनिधी गावातील सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, बचत गटांतील महिला, युवक मंडळे व ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत. जिल्हा, तसेच तालुका स्तरावरील नेमून देण्यात आलेले संपर्क अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी हे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
योजनेचे उद्दिष्ट
घरकुल योजना पूर्ण करून बेघरांना निवारा मिळवून देणे, ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य या मूलभूत गरजा पूर्ण करणे आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विकासाची गंगा पोहोचवणे, हेच या अभियानाचे खरे यश ठरेल, असे रानडे यांनी सांगितले.
कोट्यवधींची बक्षिसे
पालघर जिल्ह्यातही हे अभियान प्रभावीपणे राबवले जाणार आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांना कोट्यवधींच्या बक्षिसांनी गौरविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेला राज्य स्तरावर पहिल्या क्रमांकासाठी पाच कोटी, दुसऱ्यासाठी तीन कोटी, तर तिसऱ्यासाठी दोन कोटींचे बक्षीस मिळणार आहे. पंचायत समित्यांसाठी अनुक्रमे दोन कोटी, दीड कोटी आणि सव्वा कोटींची, तर ग्रामपंचायतींसाठी पाच कोटी, तीन कोटी व दोन कोटींची बक्षिसे निश्चित करण्यात आली आहेत. विभागीय स्तरावर कोटी रुपयांपासून लाखोंपर्यंतची, तर जिल्हा व तालुका स्तरावर अनुक्रमे ५० लाख, ३० लाख, २० लाख आणि १५ लाख, १२ लाख व आठ लाख अशा आकर्षक बक्षिसांचा समावेश आहे.