डम्पिंग ग्राउंडमुळे श्वसनाचे आजार
चाविंद्रा येथील नागरिकांचे आयुक्तांना निवेदन
भिवंडी, ता. १६ (वार्ताहर) : भिवंडी पालिका क्षेत्रातील जमा होणारा साडेचारशे टन कचरा टाकल्या जाणाऱ्या चाविंद्रा येथील डम्पिंग ग्राउंड तत्काळ बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. चाविंद्रा रामनगर या रस्त्यावर पालिकेची शाळा क्रमांक ४६ च्या समोर चाविंद्रा सिटी पार्कसाठी आरक्षित भूखंडावर लोकवस्तीलगत सुरू असलेल्या डम्पिंगच्या दुर्गंधी व धुरामुळे येथील चाविंद्रा, गायत्रीनगर, पोगाव, नागाव व सभोवताली असणाऱ्या नागरी वस्तीत राहणारे नागरिक त्रस्त झाले आहेत. येथील डम्पिंग तत्काळ बंद करण्याची मागणी ग्रामस्थ सुरेश पाटील, राम पाटील, संदीप पाटील, तेजस पाटील, देव पाटील, सुरेश पाटील, अनंता पाटील यांनी निवेदनाद्वारे पालिका आयुक्त अनमोल सागर व उपविभागीय अधिकारी अमित सानप यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहरातील जमा होणारा कचरा डम्पिंग करण्यासाठी २००८ मध्ये तत्कालीन प्रशासनाने तात्पुरती व्यवस्था म्हणून चाविंद्रा येथील सिटी पार्कसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर कचरा टाकण्यास सुरुवात केली. तेव्हापासून सुरू झालेले डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी पालिका प्रशासनाने कधी प्रामाणिक प्रयत्न केलेच नाहीत. दरम्यान, शासनाकडून दोन वेळा डम्पिंग ग्राउंडसाठी भूखंड देण्यात आला; मात्र दोन्ही ठिकाणी स्थानिकांचा होणारा विरोध पाहता ते प्रकल्प बासणात गुंडाळून पडले आहेत. त्यामुळे चाविंद्रा येथील कचरा टाकणे आजही सुरू आहे. दुर्दैव म्हणजे येथील कचरा साठवणूक क्षमता संपल्यानंतरही या ठिकाणी शहरातील दररोज जमा होणारा किमान ४५० मेट्रिक टन कचरा टाकला जात आहे.
चाविंद्रा, गायत्रीनगर, पोगाव व सभोवताली असणाऱ्या येथील स्थानिक ग्रामस्थ जन्मापासून येथे वास्तव्यास आहोत. त्यापैकी बहुतांश येथील शेतीवर आपली उपजीविका करीत आहेत, तर या डम्पिंग ग्राउंडलगत वनखात्याच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी बसलेली आहे. ज्यामुळे येथील लोकसंख्या ३० हजारहून अधिक आहे. येथील नागरिकांना पायाभूत व नागरी सुविधा देणे हे पालिका प्रशासनाचे कर्तव्य आहे. येथील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाची आहे. असे असताना येथील सिटी पार्कसाठी आरक्षित भूखंडावर कचरा साठविणे अन्यायकारक आहे. या कचऱ्यामधील प्लॅस्टिक, ज्वलनशील कचरा, केमिकलयुक्त कचरा जळल्याने नागरिकांनी उग्र वास, दुर्गंधी यासह श्वसनाचा त्रास होत आहे. सदर कचऱ्याच्या ढिगाऱ्यासमोर शाळा असून, शाळेतील विद्यार्थ्यांना दुर्गंधीमुळे शिक्षण घेणेही कठीण झाले आहे. अशी प्रतिक्रिया राम पाटील यांनी दिली आहे.
शेरजमीन नापीक
ढिगाऱ्यातील कचरा आमच्या मालकीच्या शेतीत पसरल्याने शेतजमीन नापीक होऊन नुकसान होत आहे. याविरोधात स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी व समाजसेवकांनी तोंडी व लेखी तक्रारी दिल्या असून, याबाबत महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त, महापौर व प्रशासक यांनी प्रत्यक्षदर्शी सदर डम्पिंगच्या ठिकाणी भेट देऊन सदर डम्पिंग बंद करण्याबाबत महासभेने ठराव पारीत केले आहेत, मात्र प्रत्येकवेळी पालिका प्रशासन वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप अनंता पाटील यांनी केला आहे.
आंदोलनाचा इशारा
सिटी पार्कसाठी आरक्षित भूखंडावर तात्पुरत्या स्वरूपात सुरू केलेला डम्पिंग ग्राउंड मागील १७ वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे स्थानिकांना दुर्गंधी, धुरामुळे श्वसनाच्या त्रास होत आहे. येत्या सात दिवसांत निर्णय न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करू, असा इशारा सुरेश यशवंत पाटील यांनी दिला आहे.