पालघर, ता. १६ (बातमीदार) : महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून दरवर्षी २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारतदिन साजरा केला जातो. यानिमित्ताने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत यंदाही स्वच्छता ही सेवा हा विशेष उपक्रम १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश नागरिकांच्यात स्वच्छतेबाबत वर्तणूक बदल घडवून आणणे हा आहे. या अभियानासाठी ‘स्वच्छोत्सव’ ही थीम निश्चित करण्यात आली असून, विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे.
तालुका व गाव स्तरावर स्वच्छता उपक्रम राबविण्यात येणार आहेत. गावातील अस्वच्छ ठिकाणांची निवड करून त्यांचे मॅपिंग व स्वच्छता केली जाणार आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणे, संस्था, प्रतिष्ठाने व जास्त लोकसंख्या असलेले भाग या ठिकाणीही स्वच्छता मोहीम हाती घेतली जाईल. सफाईमित्रांच्या आरोग्य व सामाजिक सुरक्षेसाठी विशेष उपक्रम आखण्यात आले आहेत. सफाईमित्र सुरक्षा शिबिरे आयोजित करून सर्व पात्र लाभार्थ्यांना सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यात येईल. तालुका स्तरावर शिबिरे होणार असून, आरोग्य तपासणी व लाभ योजना देण्यात येतील.
क्लीन ग्रीन उत्सव पर्यावरणपूरक व शून्य कचरा पद्धतीने साजरे केले जातील. स्वच्छ सुजल गाव, कचऱ्यापासून कलाकृती, स्वच्छ स्ट्रीट फूड केंद्र यांसारखे प्रबोधनपर उपक्रम राबविले जातील. २५ सप्टेंबर रोजी एक दिवस-एक तास-एक सोबत या संकल्पनेतून देशव्यापी श्रमदान होणार असून, त्यात जिल्ह्यातील सर्व गावांचा सहभाग अपेक्षित आहे. या कालावधीत विशेष ग्रामसभांद्वारे गावे हागणदारीमुक्त अधिक मॉडेल गाव व स्वच्छ सुजल गाव म्हणून घोषित केली जाणार आहेत. अभियानातील सर्व उपक्रम केंद्र सरकारच्या https://swachhatahiseva.gov.in या आयटी पोर्टलवर अपलोड केले जाणार असल्याने त्यावर थेट देखरेख ठेवली जाईल. या अभियानाचे नियोजन जलजीवन मोहिमेचे प्रकल्प संचालक अतुल पारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
सहभागी होण्याचे आवाहन
ग्रामीण भागात स्वच्छतेची चळवळ अधिक प्रभावी करण्यासाठी ग्रामपंचायतींसह सार्वजनिक उत्सव मंडळे, महाविद्यालये, शाळा, एनएसएस, एनसीसी, विद्यार्थी, सामाजिक व सेवाभावी संस्था, महिला बचतगट आणि नागरिक यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी केले आहे.