Maharashtra Politics Live Updates : मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाषणादरम्यान ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ
Sarkarnama September 17, 2025 03:45 PM
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाषणादरम्यान ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेदरम्यान, ओबीसींवर अन्याय करू नका, असे म्हणत काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याची घटना घडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते. यावेळी त्यांचं भाषण सुरू होताच काही लोकांनी जोरदार घोषणाबाजीला सुरूवात केली. त्यामुळे काहीकाळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, तो खटला पुन्हा सुरू करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा सुरू करण्याचे आदेश विशेष सत्र न्यायालयाने दिले आहेत. यामुळे आता भुजबळांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Manikrao Kokate : मंत्री माणिकराव कोकाटे मानहानी प्रकरणाच्या सुनावणीला आजपासून सुरूवात

क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे मानहानी प्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयात आजपासून सुनावणी सुरू होणार आहे. कोकाटे यांनी विधिमंडळ अधिवेशनात रमी खेळल्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी व्हायरल केला होता. या प्रकरणी कोकाटेंनी रोहित पवारांना नोटीस बजावली होती. नोटीसच्या माध्यमातून आठ दिवसात माफी मागण्याचा रोहित पवारांना इशारा दिला होता. मात्र, या नोटीसकडे रोहित पवारांनी दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर मानहानी दावा दाखल करण्यात आला होता.

PM Modi Birthday : PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त नागपूरात स्वच्छता अभियान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरातील डॉ. हेडगेवार चौकात स्वच्छता अभियान सुरू करण्यात आलं आहे. भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वात हे अभियान सुरू करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने नागपूर शहर भाजप कडून 111 ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.

Pratap Sarnaik : मयत मराठा आंदोलकांच्या कुटुंबियांना प्रताप सरनाईकांकडून 25 लाखांची मदत

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केल्यानंतर हजारो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले. त्यानंतर जरांगेंच्या मागणीनुसार राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटचा जीआरही काढला. मात्र, या आंदोलनादरम्यान पाच मराठा आंदोलकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या आंदोलकांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी 25 लाखांची आर्थिक मदत दिली आहे. प्रत्येक मयत आंदोलकाच्या कुटुंबियांना त्यांनी पाच लाखांची मदत केली आहे.

PM Modi 75th Birthday PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध उपक्रम

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांत 'चलो जीते है' हा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट देशभरातील लाखो शाळांमध्ये आणि काही चित्रपटगृहांमध्ये दाखवण्यात येणार आहे. 2018 मध्ये रिलिज झालेला हा चित्रपटात स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या मोदींच्या बालपणावर आधारित आहे.

PM Modi 75th Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींना डोनाल्ड ट्रम्प यांनी फोनवरून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 75वा वाढदिवस आहे. या निमित्ताने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना फोनवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याबाबतची माहिती मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. या पोस्टमधून त्यांनी ट्रम्प यांचे आभार मानले आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.