Kolhapur Corruption : महादेव मंदिराला केले भक्त निवास, लाखो रुपयांचा ढपला?; ठेकेदारासह कोल्हापूर जिल्हापरिषदेचे अधिकारीही सामील
esakal September 17, 2025 03:45 PM

Kolhapur Temple Scam News : पिराचीवाडी (ता. कागल) येथील ग्रामस्थांचे आणि परिसरातील नागरिकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या महादेव मंदिराशेजारी पुरुषांसाठी भक्त निवास बांधण्याची परवनगी देऊन निधी मंजूर केला होता. पुरुष भक्त निवाससाठी ३५ लाख ७८ हजार रुपये आणि रिटेनिंग वॉलसाठी ३९ लाख १७ हजार रुपये याशिवाय इतर खर्चाचे ८४ लाख ४९ हजार रुपये ठेकेदाराला दिले आहेत; मात्र, महादेव मंदिरालाच भक्त निवासाचे स्वरूप दिल्याने त्याला स्वतंत्र भक्त निवास म्हणता येत नाही. त्यामुळे महादेव मंदिराला मंदिर म्हणायचे की भक्त निवास असा संभ्रम निर्माण झाला आहे.

माहितीच्या अधिकाराखाली घेतलेल्या माहितीनुसार पिराचीवाडी येथे प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत २०२१-२२ मध्ये जिल्हास्तरावर मंजुरी मिळाली होती. यामध्ये महादेव मंदिर आणि हनुमान मंदिर परिसरात पुरुषांसाठी वेगळे आणि महिलांसाठी वेगळे भक्त निवास बांधण्याची परवानगी होती. हनुमान मंदिरासाठी शाळेच्या आवारात आणि खोल्यांमध्ये महिलांसाठी वेगळे भक्त निवास बांधले आहे. त्यानुसार, महादेव मंदिर परिसरात वेगळ भक्त निवास बांधलेले नाही.

मंदिर असताना त्यालाच पुरुषांच्या भक्त निवासाचे स्वरूप दिले आहे. मंदिर परिसरात याचे बांधकाम झालेले नसून, मंदिरच भक्त निवास म्हणून दाखवले आहे. त्यामुळे शासनाने दिलेल्या निधीचे काम झाले असल्याचे दिसत नाही. यासाठी दिलेल्या निधीचा योग्य वापर झाला आहे का, याची चौकशी काम पूर्ण झाल्याचा दाखला देणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी केलेले नाही.

हनुमान मंदिर महिला भक्त निवास आणि महादेव मंदिर पुरुष भक्त निवास परिसर सुशोभीकरणासाठी ५५ लाख नऊ हजार रुपयांचा निधी दिला आहे; मात्र, हनुमान मंदिराशेजारील दाखवलेल्या भक्त निवास परिसरात आणि महादेव मंदिर परिसरातील सुशोभीकरण झालेले नाही. त्यामुळे एवढा मोठा निधी गेला कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्व निधीचा योग्य वापर झाल्यास पिराचीवाडी गावाचा विकास अधिक समृध्द होण्यास मदत होणार आहे. (क्रमश:)

रात्रीत भक्त निवासच्या नावाची रंगरंगोटी

शासकीय नियमानुसार ज्या ठिकाणी भक्त निवास बांधले आहे, तेथे त्या कामाचा फलक लिहिणे, कामाचे स्वरूप, ठेकेदाराचे नाव व कामाचा किती निधी मिळाला, याचा फलक लिहिणे बंधनकारक आहे; मात्र भक्त निवासची माहिती व पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे सांगितल्यानंतर ठेकेदाराने एका रात्रीत दोन्ही भक्त निवासावर पुरुष व स्त्री भक्त निवास असे भगव्या अक्षरात फलक लिहिले आहेत.

Kolhapur Bhakt Niwas Scam : भक्त निवास म्हणून दाखवल्या शाळेच्या खोल्या, निधीचा गैरवापर; माहितीच्या अधिकारात धक्कादायक माहिती, मुख्य सूत्रधार कोण?

गावाचा निधी गावासाठीच खर्च झाला पाहिजे

गावाचा निधी हा गावकऱ्यांचा हक्काचा असतो. तो गावाच्या गरजा पूर्ण व्हाव्यात, श्रध्दास्थान सुशोभित व्हावे, भाविकांना सुविधा मिळाव्यात यासाठी दिला जातो. महादेव मंदिराशेजारी चांगले भक्त निवास होणे अपेक्षित होते; पण, मंदिरालाच भक्त निवासचे स्वरूप दिले आहे. सुशोभीकरणासाठी दाखवलेले काम अपुरे आणि दिशाभूल करणारे ठरत आहे.

महादेव मंदिराचा गाभारा आणि कळस गामस्थांच्या निधीतून बांधला आहे. उर्वरित काम हे शासकीय निधीतून आणि मोजमापाप्रमाणे केले आहे. स्वच्छतागृहासाठी नवीन निधीची मागणी केली आहे.

सुभाष पां. भोसले, ठेकेदार

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.