'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' अभियान आजपासून
esakal September 17, 2025 12:45 PM

पिंपरी, ता. १६ ः महिलांचे आरोग्य व सक्षमीकरण हे कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीचे प्रमुख केंद्रस्थान आहे. हे लक्षात घेऊन भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ हे विशेष राष्ट्रीय अभियान १७ सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान संपूर्ण देशभर राबविण्यात येणार आहे. राज्यातही याचा प्रारंभ बुधवारी (ता. १७) होत आहे. या अनुषंगाने महापालिकेच्या सर्व रुग्णालये व दवाखान्यात विविध आरोग्य शिबिरे, तपासण्या आणि जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी वैद्यकीय विभागाच्या वतीने विशेष नियोजन केले आहे.
या अभियानाचा प्रारंभ तालेरा रुग्णालय, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय व कै. ह.भ.प. मल्हारराव कुटे स्मृती रुग्णालय येथे महापालिका अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ही शिबिरे महापालिकेच्या आठही रुग्णालयात तसेच ३१ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात व नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र येथे १७ सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर २०२५ पर्यंत दररोज आयोजित करण्यात आलेली आहेत. महिलांनी शिबिरातील विविध सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन वैद्यकीय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

अभियानाची वैशिष्ठ्ये
- उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, क्षयरोग, ॲनिमिया तपासणी
- गर्भवती महिलांची तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, पोषण समुपदेशन, लसीकरण
- किशोरींसाठी मासिक पाळी व पोषणावरील सत्रे, समुपदेशन
- रक्त संकलनाचे लक्ष्य.
- आयुष्मान भारत डिजिटल मिशन, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व आयुष्मान वय वंदना कार्ड वितरण
- निक्षय मित्र स्वयंसेवकांची नोंदणी व क्षयरुग्णांना पोषण आहारासाठी दत्तक घेण्यास प्रोत्साहन
- आवश्यक रुग्णांना विशेषज्ञांकडून रक्त, लघवी, सोनोग्राफी, एक्स-रे आदी तपासण्या

‘महिला आणि बालकांच्या आरोग्याची काळजी घेणे म्हणजे संपूर्ण समाजाच्या आरोग्याचे संरक्षण केल्यासारखे आहे. या अभियानाद्वारे तज्ज्ञ सेवा आणि व्यापक जनजागृती करून समाजातील महिला व बालकांना निरोगी करण्याचे शासनाचे तसेच महापालिकेचे उद्दिष्ट आहे.’
- शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.