दुचाकीचा हॉर्न वाजवण्यावरून मारहाण
esakal September 17, 2025 10:45 AM

पालघर, ता. १६ : कर्णकर्कश हॉर्न वाजवल्यानंतर जाब विचारणाऱ्या दोन नागरिकांना मोटरसायकलस्वारांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार बोईसर पोलिस ठाणे क्षेत्रात सोमवारी (ता. १५) घडला आहे. ही घटना रात्री ११ वाजण्याच्या सुमारास यशवंत सृष्टी येथे घडली आहे.

मयूर कालिदास नलावडे हे यशवंत सृष्टी परिसरात उभे असताना जैन मंदिराकडून ठाकूर गॅलेक्सीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन मोटरसायकलस्वार जोरजोराने हॉर्न वाजवत होते. या आवाजामुळे त्रास झालेल्या कालिदास यांनी त्यांना जोरजोरात हॉर्न का वाजवतात, असा जाब विचारला. यानंतर मोटरसायकलस्वार व त्याच्या पाठीमागे बसलेले दोघे जण आणि कालिदास यांच्यामध्ये वादावादी झाली. त्याचे रूपांतर मारहाणीत झाले. मोटरसायकलवरील तिघांनी कालिदास यांच्यासह त्यांचे मित्र सूरज वाडेकर आणि सुधीर वाडेकर यांना मारहाण केली व ते तिथून फरार झाले. याप्रकरणी कालिदास यांनी बोईसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बोईसर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध घेत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.