रोह्याच्या नव्या नाट्यगृहात मराठी रंगभूमीचे स्वागत
संगीत देवबाभळी नाट्यप्रयोगाला शहरांसह ग्रामीण रसिकांची मोठी गर्दी
रोहा, ता. १६ (बातमीदार) ः रोह्यात नव्याकोऱ्या डॉ. चिंतामणराव द्वा. देशमुख नाट्यगृहाचे नुकतेच लोकार्पण झाले आहे. या नाट्यगृहात राष्ट्रवादीकडून नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, सोमवार (ता. १५) संगीत देवबाभळी हा मराठी नाट्यप्रयोग झाला. या प्रयोगाला रसिक-प्रेक्षकांनी तुफान गर्दी करत दाद दिली, तर या वेळी राष्ट्रवादी नेते सुनील तटकरे हेही कुटुंबीयांसह उपस्थित होते.
रोह्यात ३४ कोटी ४० लाख रुपये खर्चून डॉ. चिंतामणराव द्वा. देशमुख शहर सभागृह (नाट्यगृह) बांधण्यात आले आहे. या नाट्यगृहाचे लोकार्पण शुक्रवारी (ता. १२) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. सोमवारी संगीत देवबाभळी या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. या नाटकानिमित्ताने एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव मिळाला असून, हा मनात खोलवर रुजून राहिला आहे, असे रसिकप्रेमींनी सांगितले. हा नाट्यप्रयोग पाहण्यासाठी शहर व ग्रामीण भागातील प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.
देवबाभळी हे नाटक संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या पत्नी आवळीबाई यांच्या जीवनावर आधारित असून, त्यांच्या भक्तिमय जीवनाचा आणि आवळीच्या दुःख-दैन्याचा हृदयस्पर्शी प्रवास उलगडतो. नाटकात जुन्या अभंगांना आधुनिक संगीताची जोड देत अतिशय सुंदर सादरीकरण करण्यात आले आहे. नाटकातील प्रत्येक प्रसंग, संवाद आणि अभंग प्रेक्षकांना एका आध्यात्मिक प्रवासावर घेऊन जातो. प्रकाश, संगीत आणि अभिनय यांचा सुरेख मेळ साधण्यात आला असून, संपूर्ण प्रयोग केवळ नाट्यमंचावर घडत नाही तर तो प्रेक्षकांच्या हृदयातही नकळत साकार होतो. आपल्या संस्कृतीतील भक्तिरसाची ओळख करून देणारे असे नाटक बघण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती.
तटकरेंची हजेरी
या नाट्यप्रयोगाचा सुनील तटकरे यांनी सहकुटुंब मनमुराद आनंद घेतला. या वेळी त्यांच्या पत्नी वरदा तटकरे, कन्या मंत्री आदिती तटकरे, चिरंजीव अनिकेत तटकरे, सुनबाई वेदांती अनिकेत तटकरे उपस्थित होते.
फोटो कॅप्शन :
रोहा ः देवबाभळी नाट्यप्रयोगाप्रसंगी कलाकार मंडळीसोबत तटकरे