कन्नड - तालुक्यातील चिकलठाण येथे गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून जाऊन एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. १६) दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास घडली. संजय आसाराम दळे (५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
कन्नड ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेसात वाजल्यापासून चिकलठाण मंडळात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने गांधारी नदीला मोठा पुर आला होता. संजय दळे हे सोमवारी सायंकाळी शेतातील गोठ्यातील जनावरांना चारा-पाणी करून घरी आले होते. रात्री अतिवृष्टी झाल्याने गांधारी नदी दुपारी एक वाजेपर्यंत दुधडीभरून वाहत होती.
मंगळवारी दुपारी दोन वाजल्यानंतर नदीचे पाणी आटू लागल्याने संजय दळे हे शेतातील जनावरांना चारा-पाणी करण्यासाठी गावाजवळील गांधारी नदीवरील पुलावरून जात होते. दरम्यान अचानक जोराचा पाण्याचा प्रवाह आल्याने ते पुराच्या पाण्यात वाहून गेले. पुलापासून सुमारे तीनशे फुटांवर ते एका ठिकाणी अडकले.
गावातील नागरिकांनी त्यांना कसाबसा पाण्याबाहेर काढून तातडीने कन्नड ग्रामीण रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपेश माटे यांनी तपासून दळे यांना मृत घोषित केले. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दळे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सुन, तीन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार कैलास करवंदे करत आहेत.