साकवांच्या विळख्यात अडकलेल्या कोकणाला आता मिळणार पुलांचं बळ
esakal September 17, 2025 01:45 PM

91919

साकवांच्या विळख्यात अडकलेल्या कोकणाला आता मिळणार पुलांचं बळ

गृहमंत्र्यांची घोषणा; सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसाठी विशेष पॅकेज देणार


सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १६ ः रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांत वाडी वस्त्यांमधील सर्व साकवांचे मोठ्या पुलांमध्ये रूपांतर करण्यासाठी विशेष साकव कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठीचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. ग्रामविकास विभागाकडून यासाठी विशेष पॅकेज देण्यात येणार आहे. यामुळे पावसाळ्यात पाण्यामुळे संपर्क तुटून निर्माण होणारी समस्या दूर होणार असून, लहान लघुपाटबंधारे प्रकल्प कोकणात यशस्वी करण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी कोकणासाठी विशेष निधीच्या पॅकेजसाठी प्रयत्न करणार आहोत, असे राज्याचे गृहमंत्री योगेश कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कुडाळ तालुक्यातील विविध प्रश्न, विविध विकास कामे याबाबत गृहमंत्री कदम आणि आमदार नीलेश राणे यांनी आज येथील एमआयडीसी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, उपतालुकाप्रमुख अनिकेत तेंडुलकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके आदी उपस्थित होते.
श्री. कदम म्हणाले, ‘जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघातील शासकीय कामांबाबत काल (ता.१५) आढावा बैठक घेण्यात आली. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांची सांगड घालून कोकणातील सर्व प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीने या आढावा बैठकीत सर्व संबंधित यंत्रणांकडून आढावा घेण्यात आला. जे प्रश्न आहेत, ते दूर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. पुन्हा जिल्हा दौऱ्यावर येणार असून, त्यावेळी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांकडून आढावा घेणार आहे. त्यामुळे त्यादृष्टीने कामे पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आमदार राणे आणि आमदार दीपक केसरकर प्रशासनातील अभ्यासू नेतृत्व असून, त्यांनी अनेक मुद्दे या बैठकीत मांडले. राज्यमंत्री म्हणून लोकप्रतिनिधींच्या सोबत कोकणातील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. जसे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाप्रमाणेच कोकणच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे, ही प्रथा कोकणात सुरू झाल्याचे दिसते.’
--------
मुख्यमंत्र्यांचीही साथ
मंत्री म्हणाले, ‘कोकणच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चांगली साथ असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही निधी कमी पडू देणार नसल्याचा शब्द दिला आहे. येत्या काळात सर्व प्रश्न सोडवू. आमदार केसरकर व आमदार राणे याबाबत पाठपुरावा करतीलच. कोकणातील देवस्थान, आकारीपड, रिक्त पदे, वाळू धोरण, महसूल आदी प्रश्नांबाबत जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जातील. कोकणातील अनेक वर्ष रखडलेला देवराई व देवरहाटीचा प्रश्न सोडविला आहे. त्यामुळे आता तशी नोंद असलेल्या ठिकाणच्या वास्तू व देवळांची दुरुस्ती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.’
--------------
अवैध धंद्यांना आवर घालावा
महाराष्ट्राच्या तुलनेत कोकणात अवैध धंदे प्रचंड कमी आहेत, तरीही जे चुकीचे चालले असेल त्याला पोलिसांनी वेळीच आवर घातलाच पाहिजे. पालकमंत्र्यांनी अलीकडेच केलेली कारवाई चुकीची नव्हती. पोलिस महानिरीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबत आवश्यक सूचना देऊ. एएनटी नॉर्केटिक टास्क फोर्सबाबत जिल्ह्यात आवश्यक सूचना देऊ, असेही मंत्री कदम म्हणाले. या जिल्हामार्गे बनावट दारू, ड्रग्स आणि गो-मांसची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून, याचा कायमचा बिमोड करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी आमदार राणे यांनी गृहमंत्री कदम यांच्याकडे केली. त्यावर त्यांनी तातडीने आयजी आणि एसपींशी चर्चा करून सूचना देण्यात येतील असे सांगितले.
----------------
‘टाळंबा’बाबत जनमत ऐकून निर्णय
माणगांव खोऱ्यात टाळंबा प्रकल्प मंजूर आहे. मात्र, परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे आधी तेथील लोकांना ते धरण हवं की नको हे विचारल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. जनमताचे एकमत झाले की, प्रकल्प सुरू करू, अशी भूमिका आमदार नीलेश राणे यांनी मांडली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.