वज्रेश्वरी, ता. १६ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील मनसेने अभियंता दिन वेगळ्या पद्धतीने साजरा करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा निषेध नोंदवला. वाडा-भिवंडी रोड, अंजुरफाटा-कामण रोड, अंबाडी-वज्रेश्वरी रोड तसेच तालुक्यातील सर्वत्र पडलेल्या खड्ड्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त करण्यात आला.
मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष परेश चौधरी व जनहित कक्षाचे जिल्हा संघटक ॲड. सुनील देवरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना संतापाची शाल व सडक्या फुलांचा हार अर्पण करून निषेध व्यक्त केला. सातत्याने आंदोलने व निवेदन देऊनही रस्त्यांच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष होत आहे. अभियंता दिन हा आमच्यासाठी अभिमानाचा दिवस आहे. भारतीय अभियंता आपल्या कार्यकुशलतेमुळे जागतिक पातळीवर मान मिळवत आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंते भ्रष्टाचारात गुरफटले आहेत. त्यांच्या कामकाजाला साजेसा ‘सन्मान’ आज आम्ही केला, असे ॲड. सुनील देवरे यांनी सांगितले. या वेळी मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा सचिव हर्षल भोईर, जनहित कक्षाचे जिल्हा सचिव रोशन भाने, मिलिंद खंडागळे, अजय भानुशाली, कुणाल आहिरे, यश गुळवी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.