उल्हासनगरात संततधार पाऊस
esakal September 17, 2025 11:45 AM

संततधार पावसामुळे घराची पडझड
उल्हासनगरमधील कुटुंब बेघर
उल्हासनगर, ता. १६ (वार्ताहर) : संततधार पावसाने उल्हासनगरमधील एका कुटुंबाला अक्षरशः उद्ध्वस्त केले आहे. वसीटा कॉलनीतील जीर्ण घराचे पत्रे कोसळल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच घरातील समान काही मलब्यात गाडले गेले. जीवितहानी टळली असली तरी एकुलता एक कमावता सदस्य आधीच रुग्णालयात असल्याने या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

उल्हासनगर कॅम्प नंबर ४ येथील वसीटा कॉलनी-बी, घर क्रमांक १२४२, रूम क्रमांक २ येथे नरेश भागचंद वसीटा यांच्या घराचे पत्रे सोमवारी (ता.१५) संध्याकाळी अचानक कोसळले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. नरेश वसीटा आजारपणामुळे रुग्णालयात दाखल होते. त्यांचा परिवारदेखील त्यांच्याजवळ रुग्णालयात उपस्थित होता. त्यामुळे घटना घडली तेव्हा कोणीही घरात नव्हते; मात्र घरातील फर्निचर, भांडी, कपडे, दस्तऐवज असे सर्व साहित्य मलब्यात दबून पूर्णपणे नुकसान झाले. या घटनेमुळे वसीटा कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. कारण, घर चालविण्याची जबाबदारी एकट्या नरेशवर होती. तेच कुटुंबाचे एकुलते एक कमावते सदस्य असल्याने घर उद्ध्वस्त झाल्यानंतर कुटुंब आर्थिक अडचणीत आणि मानसिक धक्क्यात सापडले आहे.

स्थानिक नागरिकांनी तातडीने प्रशासनाने या कुटुंबाला मदत करावी, निवारा उपलब्ध करून द्यावा आणि तातडीची आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी केली आहे. पावसामुळे शहरातील अनेक जीर्ण घरे धोक्यात असल्याने महापालिकेने त्वरित सर्वेक्षण करून योग्य ती उपाययोजना करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.