काटेवाडी, ता. १६ : ‘‘शासनाचा ‘पोषण भी पढाई भी’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम आहे. अंगणवाडीतील लहान बालकांना आपलेपणाने समजावून घ्यावे, पालकांचे समुपदेशन करावे, नवीन पौष्टिक पदार्थांची अंमलबजावणी करावी. सक्षम अंगणवाडी, आहार पद्धती व शैक्षणिक दृष्टिकोन याबाबत क्षमता विकसित करावी,’’ असे आवाहन गटविकास अधिकारी किशोर माने यांनी अंगणवाडी सेविकांना केले.
‘पोषण भी पढाई भी’ या तीनदिवसीय प्रशिक्षणाचे उद्घाटन मंगळवारी (ता. १६) पंचायत समिती बारामती येथे किशोर माने यांच्या हस्ते झाले. सहाय्यक बाल विकास प्रकल्प अधिकारी डी. ए. नवले यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी ‘पोषण भी पढाई भी’ या कार्यक्रमाची उद्दिष्टे स्पष्ट करत प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. या तीनदिवसीय प्रशिक्षणात मास्टर ट्रेनर म्हणून वनिता गाडे, राणी जाधव, शमिका दगडे, सुनीता पवार, विनया उंडे आणि वंदना चव्हाण या पर्यवेक्षिका मार्गदर्शन केले. शमिका दगडे यांनी सूत्रसंचालन केले. वंदना चव्हाण यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला बाल विकास प्रकल्प अधिकारी अभिमान माने, आयसीडीएस आस्थापना विभागाचे हनुमंत राऊत आदी उपस्थित होते.
प्रशिक्षणाची मुख्य उद्दिष्टे :
प्रारंभिक उत्तेजन (० ते ३ वर्षे) आणि प्रारंभिक बालसंगोपन आणि शिक्षण (३ ते ६ वर्षे) यांना प्रोत्साहन देणे.
अंगणवाडी कार्यकर्त्यांची क्षमता विकसित करणे, जेणेकरून ते उच्च दर्जाचे खेळ-आधारित शिक्षण देऊ शकतील.
विकासाच्या क्षेत्रांवर (भौतिक आणि गतिशील, संज्ञानात्मक, सामाजिक-भावनिक-नैतिक, सांस्कृतिक/कलात्मक) आणि पायाभूत साक्षरता व संख्यात्मकता यावर लक्ष केंद्रित करणे.
सक्षम अंगणवाडी, पोषणातील नवकल्पना, पोषण ट्रॅकर, आहार पद्धती, एसएएम/एमएएम व्यवस्थापन आणि सूक्ष्म पोषक तत्त्वांची कमतरता याबाबत अंगणवाडी कार्यकर्त्यांची समज बळकट करणे.