चाकण, ता. १६ : चाकण- आंबेठाण मार्गावर पीएमआरडीएच्या वतीने कुठलाही मोबदला न देता शेतकऱ्यांच्या स्वमालकीच्या जागेत होत असलेल्या अतिक्रमण कारवाई विरोधात शेतकरी, तसेच नागरिकांनी आवाज उठवत निषेध मोर्चा काढला होता. यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण कारवाई फक्त नऊ मीटरच्या आतमध्येच करण्यात येईल, साडेबारा मीटरपर्यंत करण्यात येणार नाही, असे पत्र दिल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांनी सांगितले.
अतिकर्मण कारवाईबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य गोरे यांचा प्रशासनाकडे पाठपुरावा चालू होता. या मार्गावरील अतिक्रमण कारवाई तूर्तास साडेबारा मीटर ऐवजी नऊ मीटर अंतर्गत करून पुढील काळात अतिरिक्त जागा संपादित करताना जमीनधारकांना योग्य मोबदला देऊन योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी निषेध मोर्चादरम्यान अनेकांनी केली होती. या मागणीचा विचार करून अतिक्रमण कारवाईचे अधिकृत पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळाल्याचे गोरे यांनी सांगितले.
हे पत्र मिळाल्याने शेतकरी, स्थानिक नागरिक, रहिवासी यांनी मात्र समाधान व्यक्त केले. या अतिक्रमण कारवाईमध्ये घरे, दुकाने जात होती. त्यामुळे शेतकरी, नागरिक, रहिवासी यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत होते.
याबाबत चाकण शहर काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी सांगितले की, ‘‘सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या ताब्यात चाकण आंबेठाण जेवढा रस्ता आहे तेवढाच रस्ता घ्यावा. बाकीचे अतिक्रमण काढू नये. शेतकरी, नागरिक, रहिवासी यांच्यावर अन्याय करू नये. मोजणी करावी. मोबदला द्यावा त्यानंतर अतिक्रमण काढावे.’’