निधी असूनही शिवशाहीला एसआरए प्रकल्प मिळेनात!
esakal September 17, 2025 02:45 PM

निधी असूनही शिवशाहीला एसआरए प्रकल्प मिळेनात!
एसआरए प्राधिकरणाकडून प्रतिसाद नाही; अधिकाऱ्यांची खंत, ४५० कोटींचा निधी उपलब्ध
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मुंबई शहरासह उपनगरातील वर्षानुवर्षे रखडलेले झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प (एसआरए) मार्गी लावण्यासाठी एसआरए प्राधिकरणाकडून विविध अस्थापनांना दिले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाने काही प्रकल्प देण्याबाबत एसआरएकडे मागणी केली होती. तसेच पुनर्विकासासाठी सुमारे ४०० कोटी रुपये निधी असूनही त्यांच्याकडून सहा महिन्यांत एकही प्रकल्प दिला नसल्याची खंत शिवशाहीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील जवळपास ६०० हून अधिक एसआरए प्रकल्प १० वर्षांहून अधिक काळापासून रखडलेले आहेत. त्यामुळे हजारो झोपडपट्टीवासीय वर्षानुवर्षे पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत, तर काही ठिकाणी पुनर्विकास अर्धवट रखडलेला आहे. सदरचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी एसआरए प्राधिकरणाने एमएमआरडीए, म्हाडा, सिडको, महाहौसिंग, महाप्रित, एमआयडीसी, मुंबई महापालिका यांना संयुक्त भागीदारी तत्त्वावर राबवण्याची मान्यता दिली असून, त्याबाबतची कार्यवाही केली आहे. त्याच धर्तीवर शिवशाही पुनर्वसन प्रकल्प कार्यालयाला रखडलेले प्रकल्प देण्यात यावेत, अशी मागणी केली होती, मात्र त्याबाबत एसआरएकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे एसआरएकडून प्रकल्प देण्यास टाळाटाळ का केली जात आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाची १९९८ मध्ये मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने स्थापना केली होती. त्यानुसार दादर येथे पहिला पुनर्विकास प्रकल्प शिवशाहीने राबवला होता. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी एसआरए प्रकल्प पूर्ण केले आहेत. तसेच सध्या पुरेसा निधी उपलब्ध आहे. त्या आधारेच त्यांनी प्रकल्पाची मागणी केली होती.

अशी आहे सद्यस्थिती
- रखडलेले एकूण एसआरए प्रकल्प - ६०० हून अधिक
- विविध प्राधिकरणाला दिलेले एसआरए प्रकल्प - २५०
- शिल्लक एसआरए प्रकल्प - ३५०

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.