वाचू आनंदाने उपक्रम रंगला युनायटेडमध्ये
esakal September 17, 2025 02:45 PM

- rat१६p९.jpg-
२५N९१८३१
चिपळूण ः युनायटेडच्या प्रांगणात रंगलेल्या वाचू आनंदाने उपक्रमात सहभागी चिपळूणकर.

रंगला युनायटेड स्कूलमध्ये रंगला ‘वाचू आनंदाने’ उपक्रम
चिपळूण पालिकेचा पुढाकार ; वाचनप्रेमी दोन तास निसर्गाच्या सान्निध्यात
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १६ ः युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये रविवारी वाचू आनंदाने हा उपक्रम पार पडला. या प्रसंगी उपस्थितांना वाचनालयाकडून पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली होती. या निमित्ताने मोबाइलमध्ये व्यस्त असलेल्या अनेकांच्या हातामध्ये पुस्तकं पाहायला मिळाली.
प्रत्येक रविवारी सकाळी दोन तास निसर्गाच्या सान्निध्यात वाचन करण्याचा ‘वाचू आनंदाने’ हा उपक्रम चिपळूण पालिका, लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू आहे.
पावसाळ्यात या उपक्रमाला तुलनेने कमी प्रतिसाद मिळत होता. पाऊस कमी असल्याने रविवारी युनायटेडमधील उपक्रमाला विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. गेल्या अनेक महिन्यांपासून हा उपक्रम जंगल, धामणवणे, गांधारेश्वर, नारायण तलाव आदी निसर्गरम्य ठिकाणी होत आहे. या वेळी युनायटेड इंग्लिश स्कूलच्या निसर्गरम्य परिसरात, कौलारू इमारतींच्या सान्निध्यात वाचनाची बैठक पार पडली. दोन तास मोबाइलपासून दूर राहून वाचनाचा आनंद घेणारे शिक्षक, प्राध्यापक, साहित्यिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निमित्ताने संपूर्ण परिसर वाचनप्रेमींच्या उपस्थितीने गजबजून गेला होता. या कार्यक्रमाला युनायटेडचे मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध, उपमुख्याध्यापक संजय बनसोडे, कवी अरुण इंगवले, वाचनालयाचे अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, लोटिस्माचे विनायक ओक, प्रा. स्नेहल कुलकर्णी, मंगेश खेडेकर, विश्राम सूर्यवंशी, अजित चव्हाण, मुख्याध्यापिका पद्मजा येसादे आदी मान्यवर उपस्थित होते.
---
कोट
चिपळूण पालिकेकडून अनेक समाजहिताचे उपक्रम राबवले जात आहेत. त्यातील वाचू आनंदाने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. या निमित्ताने अनेक नागरिक एकत्र येऊन वाचनसंस्कृती जोपासत आहेत.
- विभाकर वाचासिद्ध, मुख्याध्यापक

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.