जपान हा देश दीर्घायुषी लोकांचा आहे असं आपल्या कानावर सातत्याने येत असतं. जपानमध्ये 'सेंच्युरी' मारलेले अनेक नागरिक आहेत.
पण तुम्हाला माहितीये का, जपानमध्ये किती जणांनी शंभरी ओलांडली आहे? त्याचा आकडा थक्क करून टाकणारा आहे.
सरकारनं नुकतंच जाहीर केलंय की, जपानमध्ये वयाची शंभरी ओलांडलेल्या नागरिकांची संख्या 1 लाखांच्या जवळ पोहोचली आहे. काहीच दिवसात ही संख्या 1 लाखांच्या वर जाईल.
जपानने केवळ संख्येच्याच बाबतीत विक्रम केला असं नाही तर सातत्याने गेल्या 55 वर्षांपासून सर्वाधिक 'शतकवीरां'चा विक्रमही जपानच्याच नावावर असल्याचं आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितलं आहे.
सप्टेंबर महिन्यापर्यंत 99,763 जणांनी शंभरी ओलांडली आहे. यात महिलांची संख्या लक्षणीय आहे. या संख्येपैकी 88 टक्के महिला आहेत.
जपान हा जगातील सर्वाधिक आयुर्मान असलेला देश आहे. त्याचबरोबर सध्या सर्वाधिक वयाची जिवंत व्यक्ती देखील जपानमध्येच आहे.
काही संशोधनांनी वृद्धांच्या आकडेवारीला आव्हान देखील दिलं आहे. 'अनेक देशांमध्ये नोंदी व्यवस्थित नसतात. अन्यथा जगभरात शंभरी ओलांडलेल्या नागरिकांची संख्या जास्त दिसली असती', असं या संशोधकांचं म्हणणं आहे.
सर्वाधिक वेगानं वृद्धांची संख्या वाढणाऱ्या समुदायात जपानदेखील आहे. जपानी नागरिकांची सकस आहारशैली परंतु कमी जन्मदरामुळे हे घडल्याचे दिसते.
'ज्येष्ठ नागरिकांचे आभार'जपानच्या नारा शहराचे उपनगर यामाटोकोरियामा येथे राहणाऱ्या शिगेको कागावा या आजी तब्बल 114 वर्षांच्या आहेत.
त्या सर्वाधिक वय असलेल्या नागरिक आहेत, अशी नोंद जपानमध्ये आहे, तर इवाटा या किनारपट्टीवर असलेल्या शहरातील कियोटाका मिझुनो हे सर्वाधिक वय असलेले पुरुष आहेत. त्यांचं वय 111 असल्याची नोंद झालेली आहे.
जपानचे आरोग्य मंत्री टाकामारो फुकोका यांनी शंभरी ओलांडलेल्या 87,784 महिला आणि 11,979 पुरुषांचे त्यांना लाभलेल्या दीर्घायुष्याबद्दल अभिनंदन केलं आहे. ज्येष्ठ नागरिकांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञतेची भावना देखील आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
15 सप्टेंबर हा जपानमध्ये 'ज्येष्ठ नागरिक दिन' म्हणून साजरा केला जातो.
त्या आधी ही आकडेवारी सरकारने जाहीर केली आहे. या दिवशी राष्ट्रीय सुट्टी देखील असते. या दिवशी जपानच्या पंतप्रधानांकडून नव्याने शंभरी ओलांडलेल्या नागरिकांचा रौप्य चषक आणि मानपत्र देऊन सत्कार केला जातो.
या वर्षी 52,310 जण या सन्मानास पात्र ठरल्याचं आरोग्य मंत्रालयाने आपल्या निवेदनात सांगितले आहे.
जपान हा काही अगदी सुरुवातीच्या काळापासून दीर्घायुषी लोकांचा देश म्हणून ओळखला जात नव्हता.
1960 मध्ये G7 देशांच्या आकडेवारीचा विचार केला तर जपानमध्ये शंभरी ओलांडलेल्या नागरिकांचे प्रमाण खूप कमी होते पण गेल्या काही दशकात ही परस्थिती अभूतपूर्वरीत्या बदलल्याचे दिसते.
जपानने शंभरी ओलांडलेल्या नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचे 1963 मध्ये सुरू केले. तेव्हा 100 ओलांडलेल्या नागरिकांची संख्या 153 इतकी होती.
1981 मध्ये ही संख्या 1000 इतकी झाली आणि 1998 मध्ये 10,000 एवढी झाली.
जपानी लोकांच्या दीर्घायुष्याचे कारण काय?हृदय रोगामुळे मृत्यू होण्याचे कमी प्रमाण, कॅन्सरमुळे मृत्यूचे कमी प्रमाण - त्यातही प्रोस्टेट कॅन्सर आणि स्तनांच्या कर्करोगाचे कमी प्रमाण यामुळे जपानमध्ये अधिक आयुर्मान असल्याचं मानलं जातं.
जपानमध्ये स्थूलतेचं प्रमाण कमी आहे. वरील दोन्ही आजारांसाठी मुख्यतः तेच कारणीभूत मानले जातात. आहारात कमी प्रमाणात रेड मीटचा वापर आणि मासे-भाज्यांवर जास्त भर यामुळे स्थूलतेचं प्रमाण जपानमध्ये कमी असल्याचं दिसून आलं आहे.
महिलांमध्ये स्थूलतेचं प्रमाण कमी आहे. हे देखील एक कारण असू शकते की जपानमध्ये राहणाऱ्या पुरुषांच्या तुलनेत महिला या जास्त प्रमाणात दीर्घायुषी आहेत.
चांगल्या जीवनशैलीचा प्रचारजगभरात असं निदर्शनास आलं आहे की, इतरत्र आहारात साखर आणि मीठाचं प्रमाण भरपूर आहे. त्याच वेळी जपानने मात्र वेगळी दिशा स्वीकारलेली दिसते.
मीठाचं प्रमाण आहारात कमी असावं, या गोष्टीचा सार्वजनिक स्तरावर झालेल्या यशस्वी प्रचारानंतर तेथील लोकांनी हा बदल स्वीकारला आहे.
पण हे केवळ आहारामुळेच घडलंय, असं नाही. जपानचे लोक आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात सक्रिय असतात. अमेरिका आणि युरोपच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांचं अधिक चालणं आणि सार्वजनिक वाहतूक वापरण्याचं प्रमाण अधिक दिसतं.
रेडियो ताइसो हा समूहानं केला जाणारा व्यायाम प्रकार आहे. हा व्यायाम प्रकार 1928 पासून जपानच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. याद्वारे सामूदायिक भावना आणि सदृढ सार्वजनिक आरोग्याला प्रोत्साहन दिले जाते.
सामूदायिकरीत्या केलेला तीन मिनिटांचा व्यायाम टीव्हीवरुन प्रसारित केला जातो. तसेच देशभरात छोटे-छोटे गट देखील हा व्यायाम नियमितपणे करताना दिसतात.
आकडेवारीतील त्रुटीअसं असलं तरी, अनेक संशोधनांनी जगातील शंभरी ओलांडलेल्या नागरिकांच्या संख्येबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
वृद्धांच्या नोंदी ठेवताना अनेक त्रुटी समोर येतात, जसं की अनेकवेळा त्यांची योग्य नोंद झालेली नसते. त्यांचे जन्माचे दाखले गहाळ झालेले असतात.
जर या गोष्टी विचारात घेतल्या तर जगभरात शंभरी ओलांडलेल्या वृद्धांचा आकडा खूप अधिक असू शकतो असं संशोधकांना वाटतं.
2010 मध्ये जपान सरकारने कुटुंब नोंदणीची पडताळणी केली असता समजले की 2,30,000 पेक्षा जास्त लोक शंभर वर्षांचे किंवा त्याहून अधिक वयाचे म्हणून नोंदवलेले होते. पण प्रत्यक्षात त्यांचा काही ठावठिकाणा नव्हता. त्यापैकी काही जणांचा मृत्यू तर दशकांआधीच झाला होता.
नोंद करताना आणि त्यांचे जतन करताना झालेल्या ढिसाळ कारभारामुळे आकडेवारीत गडबड झाल्याचे नंतर सांगण्यात आले.
वृद्धांना मिळणारे पेन्शन त्यांच्या मृत्यूची माहिती सरकारला मिळाल्यावर बंद होऊ शकते त्यामुळे अनेक कुटुंबांनी ही माहिती सरकारपासून दडवून ठेवली असा देखील संशय व्यक्त करण्यात आला.
सोगेन कोटो ही व्यक्ती टोकियोमधील सर्वाधिक वयाची म्हणून गणली जात होती. पण त्यांचा मृत्यू 32 वर्षाआधीच झाला होता. त्यांच्या मृतदेहाचे अवशेष सापडल्यानंतर राष्ट्रीय स्तरावर चौकशी करण्यास सुरुवात झाली होती.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)