मनोर, ता. १७ (बातमीदार) : मनोर शहरासह ग्रामीण भागातील भटके श्वान लहान मुलांसह दुचाकीस्वारांवर हल्ले करीत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या चार महिन्यांच्या कालावधीत मनोर ग्रामीण रुग्णालयात श्वानदंश झालेल्या ३८५ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. ऑगस्टमध्ये सर्वाधिक १२५ श्वानदंश झालेले रुग्ण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आले होते. निर्बीजीकरणासह अन्य उपाययोजना केल्या जात नसल्याने भटक्या श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
मनोर ग्रामपंचायत हद्दीतील बसस्थानक, नवी वस्ती, मासळी मार्केट, ख्वाजानगर, आंबेडकरनगर, रईस पाडा, खाजानगर डोंगरी, मस्जिद गल्ली, गायकवाड डोंगरी, हायस्कूल डोंगरी आणि पोलिस ठाण्याच्या परिसरात भटक्या श्वानांची दहशत आहे. दोन दिवसांपूर्वी दहा वर्षांच्या मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. स्थानिकांनी मुलीची कुत्र्यांच्या हल्ल्यातून सुटका केली होती. चार महिन्यांच्या कालावधीत ३८५ जणांना श्वानदंश झाला आहे. सर्वाधिक श्वानदंश मनोर शहरातील नागरिकांना झाल्याचे ग्रामीण रुग्णालयातील आकडेवारीवरून समोर आले आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत श्वानदंश होण्याचे प्रमाण वाढले आहे.
ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांचा प्रजनन दर नियंत्रणात आणण्यासाठी निर्बीजीकरण यांसारख्या उपाययोजना करण्याच्या मर्यादा येत आहेत. उघड्यावर टाकलेले अन्न, तसेच चिकन विक्रेत्यांकडून कोंबड्यांचे अवयव आदी कारणांमुळे भटक्या कुत्र्यांना नियमित खाद्यपुरवठा होत असल्यामुळे त्यांची संख्या झापाट्याने वाढत आहे. विणीच्या हंगामात भटके कुत्रे हिंस्र होत असल्यामुळे श्वानदंशाच्या घटनांमध्ये वाढ होते.
गेल्या काही वर्षांपासून भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे शहरासह ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांची समस्या अधिक गंभीर झाली आहे. वाहनांवरून जाणाऱ्यांच्या अंगावर धावून जाणे, बालकांच्या मागे लागून चावा घेण्याचे प्रकार सातत्याने वाढले होते. ग्रामपंचायत स्तरावर श्वानदंश रोखण्यासह भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
दुचाकीस्वारांच्या अपघातांची भीती
विणीच्या हंगामात भटके कुत्रे घोळक्याने रस्त्यावर फिरत असतात, तसेच अधिक हिंस्र झालेले असतात. भरधाव वेगातील दुचाकीच्या समोर भटके कुत्रे आल्याने अपघात घडून दुचाकीस्वार जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. भटक्या कुत्र्यांमुळे चारचाकी वाहनांचे नुकसान होते. धावत्या वाहनांवर धावून जाणे, लहान मुलांच्या मागे लागून चावा घेण्याचे प्रकार वाढले आहेत.
भटके श्वान पकडण्यासाठी ग्रामपंचायतीकडे सुविधा उपलब्ध नाहीत. जिल्हा परिषदेच्या जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडे भटके कुत्रे पकडण्याची गाडीची मागणी केली आहे. गाडी उपलब्ध झाल्यानंतर भटक्या श्वानांचा बंदोबस्त करता येईल.
- नितीन पवार, ग्रामपंचायत अधिकारी, मनोर
श्वानदंशाची आकडेवारी
जून ८२
जुलै १०४
ऑगस्ट १२५
सप्टेंबर ७१
एकूण ३८५