92133
ओरोस येथे शनिवारी
‘वंदन आचार्य अत्रेंना’
ओरोस, ता. १७ ः ‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या सप्टेंबरच्या मासिक कार्यक्रमानिमित्त शनिवारी (ता. २०) सायंकाळी ५ वाजता ‘वंदन आचार्य अत्रेंना’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. ओरोस जैतापकर कॉलनी येथील दत्तराज सहकारी सोसायटीच्या सभागृहात हा कार्यक्रम होईल.
‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ या साहित्यिक व्यासपीठाचा हा सातवा मासिक कार्यक्रम आहे. संपादक, लेखक, कवी, विडंबनकार, नाटककार, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, राजकीय नेते अशा कित्येक भूमिका लीलया पेलणारे आणि प्रत्येक क्षेत्रावर स्वतःची अमिट नाममुद्रा उमटवणारे आचार्य प्र. के. अत्रे यांची जयंती अलीकडेच झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात अग्रणी असलेले आचार्य अत्रे यांचे आयुष्य आणि कार्यकर्तृत्व अफाट आहे. जयंतीनिमित्त त्यांना वंदन करण्यासाठी हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात पुरुषोत्तम कदम (अत्रे जीवनदर्शन), डॉ. सई लळीत (आचार्य अत्रे यांची नाटके व विडंबन काव्य), सतीश लळीत (आचार्यांचे किस्से), सुधीर गोठणकर, अपर्णा जोशी व प्रिया आजगावकर (कविता वाचन), अत्रे यांचे विनोद (नम्रता रासम), ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे (अत्रे यांचे साहित्य) असे कार्यक्रम सादर होतील. हा कार्यक्रम सर्वांना खुला आहे. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समन्वयक सतीश लळीत व डॉ. सई लळीत यांनी केले आहे.