रावेत, ता. १७ : रावेतमधील म्हस्के वस्ती परिसरात प्रत्येक गुरुवारी आणि रोज सकाळी भरविण्यात येणाऱ्या आठवडे बाजारानंतर उरलेला भाजीपाला व केरकचरा पदपथावर टाकला जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तेथील ओपन जिमचे साहित्य देखील कचऱ्याने व्यापले आहे. त्यामुळे सकाळच्या वेळेत व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
या नागरिकांनी अनेकदा लेखी व तोंडी तक्रारी केल्या असूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याचे दिसून येत आहे. स्वच्छ भारत अभियानाचे फलक रस्त्यावर लावले असले तरी प्रत्यक्षात स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या परिसरात नियमित कचरा व्यवस्थापन झाले नाही; तर पावसाळ्यात दुर्गंधी व रोगराई मोठे संकट ठरू शकते, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. याबाबत ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागातील अधिकारी सुधीर वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन घेतला नाही.
महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी वेळेवर कचरा उचलत नाहीत. ओपन जिममध्ये सकाळी व्यायामाला येताना भाज्यांचा कचरा आडवा येतो. मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना त्याच्या दुर्गंधीमुळे त्रास होत आहे. तातडीने साफसफाई व्हावी.
- संजय भोसले, स्थानिक नागरिक
बाजारातून उरलेली भाजी रस्त्यावर फेकली जाते. पावसाळ्यात कचरा कुजतो आणि रोगराई पसरण्याचा धोका वाढतो. प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
- सुषमा जाधव, नागरिक