शाही मंडपात जनसुनावणी
कल्याणमधील नागरिकांचा अदाणी समूहाच्या सिमेंट प्रकल्पाला विरोध
कल्याण, ता. १७ (वार्ताहर) : मोहने येथील एन.आर.सी. कारखान्याच्या जागेवर अदाणी समूहाच्या अंबुजा सिमेंट ग्राइंडिंग युनिट सुरू करण्याच्या प्रस्तावाला स्थानिक भूमिपुत्र, नागरिक, सामाजिक संस्था, शेतकरी संघटना आणि विविध राजकीय पक्षांनी प्रखर विरोध दर्शविला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे परवानगीसाठी अर्ज केल्यानंतर हजारो नागरिकांनी या प्रकल्पाविरोधात हरकती दाखल केल्या होत्या. यावर मंगळवारी (ता. १६) झालेल्या जनसुनावणीत या हरकतींवर चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे, ही सुनावणी स्थानिक प्रशासनाच्या कार्यालयात किंवा सभागृहात न होता, प्रकल्पाच्या जागेवरच उभारलेल्या शाही मंडपात घेण्यात आल्याने नागरिकांनी यावरही विरोध नोंदविला. या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त आणि खासगी बाउन्सर तैनात केले होते.
सुनावणीमध्ये उपस्थित नागरिकांनी प्रकल्पामुळे परिसरातील प्रदूषण, आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, तसेच शेतीला होणारे नुकसान याबाबत तक्रार केली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे श्याम गायकवाड यांनी प्रकल्पाबाबत विविध प्रश्न उपस्थित केले, पण कंपनीच्या प्रतिनिधींनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. सुनावणीला अनेक माजी नगरसेवकही उपस्थित होते, ज्यात मयूर पाटील, जे. सी. कटारिया, महेंद्र गायकवाड, सुनंदा कोट, नितीन निकम, विजय काटकर, गोरख जाधव यांचा समावेश होता. शिवसेना महिला पदाधिकारी आशा रसाळ, आयटकचे कॉम्रेड उदय चौधरी, ग्रामस्थ मंडळ मोहोन्याचे अध्यक्ष सुभाष पाटील, अटाळी-आंबिवली गावचे भूमिपुत्र दशरथ पाटील, रमण तरे, वैभव पाटील यांनीही जोरदार आक्षेप नोंदवला.
कामगारांचा प्रश्न
या जागी पूर्वी काम करणाऱ्या एनआरसी कंपनीला बंद करून त्याऐवजी सिमेंट कंपनी उभारण्याचा घाट अदाणी समूहाने लावल्याचा आरोप आहे. स्थानिक कामगारवर्गावरही याचा दुष्परिणाम होणार आहे, असा संताप माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी व्यक्त केला. “स्मार्ट सिटीमध्ये असा प्रकल्प राबविणे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळणे आहे,” असे ते म्हणाले.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे स्पष्टीकरण
कल्याण विभागातील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी जयंत हजारे यांनी सांगितले की, आजच्या जनसुनावणीत सर्व हरकती आणि तक्रारींवर सुनावणी झाली आहे. या तक्रारी पुढील कार्यवाहीसाठी पर्यावरण विभागाकडे पाठवण्यात येतील. सध्या प्रकल्पाला कोणतीही परवानगी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दिलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांचे एकमत
स्थानीय रहिवाशांनी एकमताने सांगितले की, “हा प्रकल्प राबवल्यास परिसरातील पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होईल आणि लोकांचे आरोग्य धोक्यात येईल. त्यामुळे हा प्रकल्प तातडीने रद्द केला जावा.”