देशाची सर्वात मोठी कार निर्माण करणारी कंपनी मारुती सुझुकी इंडियाने येत्या २२ सप्टेंबरपासून तिच्या वाहनांची किंमत कमाल १.२९ लाखपर्यंत कपातीची घोषणा गुरुवारी केली आहे. हे पाऊल कंपनी जीएसटी रेट कटचा फायदा थेट ग्राहकांना पोहचवण्यासाठी उचलेले आहे. कंपनीने रजिस्ट्रेशन फायलिंगमध्ये म्हटले आहे की मारुती सुझुकीचे एंट्री लेव्हल मॉडेल एस प्रेसोची किंमत १,२९,६०० रुपयांपर्यंत कमी होणार आहे. याच प्रकारे ऑल्टो K10 ची किंमत १,०७,६०० रुपये, सेलेरियोची किंमत ९४,१०० रुपये, वॅगन आरची ७९,६०० रुपये आणि इग्निसची ७१,३०० रुपयांपर्यंत कमी होणार असल्याचे पीटीआयने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.
प्रीमियम हॅचबॅक कारपैकी स्विफ्टची किंमत ८४,६०० रुपये ,बलेनोची किंमत ८६,१०० रुपये आणि टूर एसची किंमत ६७,२०० रुपये, डिझायरची किंमत ८७,७०० रुपये, फ्रॉन्क्सची १,१२,६०० रुपये, ब्रेझ्झाची १,१२,७०० रुपये, ग्रँट व्हीटारा १,०७,००० रुपये,जिमनी ५१,९०० एर्टीगा ४६,४०० रुपये आणि XL6 च्या किंमतीत ५२,००० रुपयांपर्यंत घट झाली आहे. याच प्रकारे इनविक्टोची किंमत ६१,७०० रुपये, इको ६८,००० रुपये आणि सुपर कॅरी LCV ची किंमत ५२,१०० रुपयांपर्यंत घटली आहे.
सरकारने पेट्रोल, सीएनजी आणि एलपीजी इंजिन वाल्या कारवरील ( १२०० सीसीपर्यंत आणि चार मीटर लांबी ) जीएसटी दर २८ टक्क्यांवरुन १८ टक्के केला आहे. याच सोबत डिझेल इंजिनवाल्या कार ( १५०० सीसी पर्यंत आणि चार मीटर लांबी ) वर देखील १८ टक्के जीएसटी लागू केला आहे. या बदल २२ सप्टेंबर पासून लागू होणार आहे. तज्ज्ञांच्या मते जीएसटी दर कपात केल्याने वाहन खरेदी करणे स्वस्त होणार असून यामुळे ऑटोसेक्टरच्या विक्रीत सुधारणा होण्याची आशा आहे.
सरकारने जीएसटीमध्ये सुधारणा केल्याने याचा संपूर्ण परिणाम ऑटो इंडस्ट्रीवर पडणार आहे. यामुळे कंपनीच्या कारची विक्रीत मोठी वाढ होणार असून कस्टमरची मोठी बचत होणार आहे. मारुती सुझुकी शिवाय इतर कंपन्यांनी किंमतीत कपात करण्याची घोषणा केली आहे.यात प्रीमियम सेगमेंटच्या कार कंपन्यांनी देखील त्यांचे दर कमी केले आहेत.