नागपूर : जिल्हा परिषद शिक्षण विभागात शालार्थ आयडी घोटाळ्यानंतर शिक्षक वर्गात अस्वस्थता वाढली आहे. शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून प्रशासनाकडून त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
पात्र शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी, वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणी, केंद्रप्रमुख पदोन्नती याबाबत तातडीने कार्यवाही व्हावी, अशी संघटनेची मागणी आहे. मात्र, याबाबत जिल्हा प्रशासनाने अद्याप कोणतीही अचूक यादी प्रसिद्ध केलेली नाही.
हे काम नेमके केव्हा पूर्णत्वास जाईल? असा प्रश्न अन्यायग्रस्त शिक्षकांकडून उपस्थित केला जात आहे. मुख्याध्यापकांनाही शाळेच्या कारभारात अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून शासनाकडून मिळणारा निधी वेळेवर मिळत नाही.
शैक्षणिक खर्चासाठी देण्यात येणारी ४ टक्के रक्कम अद्याप खात्यात जमा न झाल्याने मुख्याध्यापकांना स्वखर्चाने शाळा चालविण्याची वेळ येत आहे. नुकत्याच झालेल्या ऑनलाइन बदली प्रक्रियेनंतर शिक्षकांना कार्यमुक्त आदेश देण्यात आलेले नाहीत. इतर जिल्ह्यात आदेश देण्यात आले असतानाही जिल्हा परिषदेतील शिक्षक प्रतीक्षेत असल्याने संभ्रमाचे वातावरण आहे.
शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर बदली करणे चुकीचे असून कार्यमुक्त आदेश तत्काळ देण्यात यावेत, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीच्या जिल्हाध्यक्ष प्रवीण फाळके, शिक्षक नेते महेंद्र बनसिंगे, विभागीय सचिव शरद काकडे, कार्याध्यक्ष सुधाकर ठाकरे यांच्यासह प्रशासनाचे लक्ष वेधले.
Teachers Rights: शिक्षकांचे फक्त सन्मानाने पोट कसे भरेल? शिक्षकांना फक्त सन्मान मिळणे पुरेसे आहे का?महेंद्र बनसिंगे, शरद काकडे, सुधाकर ठाकरे,अनंता पाणबुडे, जगदीश राऊत, राजू भिवगडे, नरेश पन्नासे, विठ्ठल जिचकार, वंदना चौधरी, योगिता पराते, संगीता मोहनकर, वर्षा परचुरे, वसुंधरा किटुकले, शोभिता कांबळे,उज्ज्वला चव्हाण, संगीता शिवणकर, अंजली पातोडे, जया वलीवकर, मंजूषा टाक,पद्मा चोंदे, सुषमा गहलोद यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.