पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी मोजणीपूर्वी भूसंपादनास सात गावांतील ९० टक्के जागा मालकांनी संमतिपत्रे सादर केली आहेत. गुरुवारी अखेरच्या दिवसांपर्यंत भूसंपादन करण्यात येणाऱ्या एकूण तीन हजार एकर क्षेत्रापैकी दोन हजार ७०० एकर जमिनींची संमतिपत्रे प्रशासनाकडे दाखल झाली आहेत. प्रथमच प्रकल्पासाठी भूसंपादन करताना अशा पद्धतीने संमतिपत्रे घेण्याचा ‘पुणे पॅटर्न’ या निमित्ताने सुरू झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी या सात गावांमधील जमिनींचे संपादन करण्यात येणार आहे. पूर्वीच्या अधिसूचनेनुसार हे क्षेत्र दोन हजार ६७३ (सुमारे सात हजार एकर) इतके होते. आता त्यात एक हजार ३८८ हेक्टरची कपात करून हे क्षेत्र एक हजार २८५ हेक्टर (तीन हजार एकर) करण्यात आले.
Pune News : सदनिकाधारक, भाडेकरूंना मोठा दिलासा; भाडेतत्त्वावर दिलेल्या सदनिकांवर अतिरिक्त सेवा शुल्क आकारता येणार नाहीत्यानुसार जमिनीचे संपादन होणाऱ्या शेतकरी व जमीन मालकांकडून संमतिपत्र घेण्यासाठी २५ ऑगस्ट ते १८ सप्टेंबरपर्यंत कालावधी निश्चित केला होता. यासाठी जिल्हा प्रशासनाने भूसंपादनास संमती देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सासवड आणि पुणे येथे स्वतंत्र कक्ष स्थापन केला होता.
पहिल्या दिवशी ७६० शेतकऱ्यांनी एक हजार ७० एकर जमीन देण्यास तयार असल्याचे संमतिपत्रे दिले तर, आज अखेरच्या दिवशी सुमारे दोन हजार ८०० शेतकऱ्यांनी दोन हजार ७०० एकर जमिनीच्या संपादनाची संमती दिली आहे.
एकूण तीन हजार क्षेत्रापैकी सुमारे ९० टक्के क्षेत्राच्या संपादनाची संमती मिळाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या नावावर नवा विक्रम नोंदविला गेला आहे. यासंदर्भात डुडी म्हणाले, ‘‘पुरंदर विमानतळाच्या प्रकल्पाबाबत संमतिपत्रे घेण्याचा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात आला. यापुढील विकास प्रकल्पांसाठी हा पुणे पॅटर्न आदर्श ठरणार आहे.’’
भूसंपादनासाठी संमतिपत्रे देण्याची मुदत गुरुवारी संपुष्टात आली. संमतिपत्रे न देणाऱ्या शेतकऱ्यांची जमीन भूसंपादन कायद्यानुसार सक्तीने संपादित करण्यात येईल. त्यांना बाजारभावाच्या चारपट मोबदला मिळेल. विकसित भूखंडाच्या परतावा देण्यात येणार नाही.
- जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी