अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे इस्रायलवर नाराज आहेत, इस्रायलने कतारवर केलेल्या हल्ल्यानंतर आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर निशाणा साधला आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने सूत्राच्या हवाल्यानं दिलेल्या बातमीनुसार कतारमध्ये लपून बसलेल्या हमासच्या नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी इस्रायलने कतारवर हल्ला केला होता, या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे प्रचंड नाराज आहेत. अमेरिकन मीडियानं केलेल्या दाव्यानुसार त्यांनी आपले परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांना म्हटलं की, नेतन्याहू मला परेशान करत आहेत, त्रास देत आहेत.
ट्रम्प नेतन्याहू यांच्यावर नाराज
कतारवर झालेल्या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे नेतन्याहू यांच्यावर प्रचंड नाराज झाले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार कतारवर हल्ला करण्यापूर्वी इस्रायलने या हल्ल्याची आधी कोणतीही कल्पाना व्हाईट हाऊसला दिली नव्हती. दरम्यान या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी फोनवरून नेतन्याहू यांच्याशी संवाद साधला, यावेळी नेतन्याहू यांच्याशी बोलताना ट्रम्प यांनी अपशब्दांचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे. कतार हा आपला मित्र देश आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विचार करा, असा इशाराही ट्रम्प यांनी नेतन्याहू यांना या हल्ल्यापूर्वी दिला होता, मात्र इस्रायलने अखेर कतारवर हल्ला केलाच. हल्ल्याची माहिती अमेरिकेला न दिल्यानं ट्रम्प हे नेतन्याहू यांच्यावर नाराज आहेत.
वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका रिपोर्टनुसार ट्रम्प यांनी आपल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उघडपणे कबुली दिली आहे की, नेतन्याहू त्यांना परेशान करत आहेत, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये इस्रायल आणि अमेरिका यांच्या संबंधावर चर्चा सुरू असतानाच ट्रम्प यांनी हे मोठं वक्तव्य केलं आहे. दरम्यान जरी इस्त्रायल परेशान करत असाल तरी आपण त्यांच्यासोबतचे संबंध तोडणार नसल्याचं देखील ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे.
चीनसोबत डील
दरम्यान दुसरीकडे आता डोनाल्ड ट्रम्प हे चीनसोबत डील करण्याच्या तयारीमध्ये आहे, लवकरच अमेरिकेमध्ये टीक टॉकवरील बंदी उठवली जाण्याची शक्यता आहे. या संदर्भात ट्रम्प आणि शी जिनपिंग यांचं बोलणं झाल्याची माहिती समोर येत आहे.