पारनेर: जमिनीच्या खरेदीखताची सात-बारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी तक्रारदाराकडे १० हजारांची लाच मागून तडजोडी अंतिआठ हजार रुपये पंचांसमक्ष स्वीकारताना वाडेगव्हाण (ता. पारनेर) येथील ग्राममहसूल अधिकारी (कामगार तलाठी) दीपक भीमाजी साठे (रा. हंगा, ता. पारनेर) यास नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्याच्या विरोधात सुपे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची माहिती अशी की, तक्रारदाराने त्यांचा मुलगा आणि दोन पुतणे यांच्या नावावर एक एकर २० गुंठे शेतजमीन त्यांच्या चुलत भावाकडून खरेदी केली होती. या खरेदी खताची नोंद मुलाच्या व पुतण्याच्या नावाने सात-बारा उताऱ्यावर लावण्यासाठी तक्रारदार ग्राममहसूल अधिकारी साठे याच्याकडे गेले.
त्यावेळी साठे याने कुरुंद गावाचा कार्यभार दुसऱ्या तलाठ्याकडे गेला आहे. मात्र, त्यांना अजून डिजिटल सिग्नेचर प्राप्त झालेली नसल्याने तुमचे काम मीच करणार आहे. ही नोंद लावण्यासाठी ग्राममहसूल अधिकारी साठे याने तक्रारदाराला १० हजार रुपयांची लाच मागितली. याबाबतची तक्रार १७ सप्टेंबर रोजी नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला प्राप्त झाली होती.