Pimpri Chinchwad Pollution : पिंपरी-चिंचवडमध्ये प्रदूषणामुळे श्वसन आजारांचा उद्रेक; महापालिकेच्या अहवालात धक्कादायक माहिती
esakal September 20, 2025 12:45 PM

अश्विनी पवार

पिंपरी : शहरातील नागरिकांमध्ये श्वसनाच्या आजारांचे प्रमाण वाढल्याचे चित्र पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पर्यावरण अहवालातून पुढे आले आहे. श्वसन संस्थांच्या आजारांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे या अहवालातील आकडेवारी सांगते. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये हवा प्रदूषणामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

महापालिकेच्या वतीने पर्यावरण सद्यःस्थिती अहवाल २०२४-२०२५ प्रसिद्ध झाला. त्यात २०२४-२५ या कालावधीतील जलजन्य, कीटकजन्य व हवेतून प्रसार होणाऱ्या आजारांची माहिती दिली आहे. या वर्षभरात हवेतून पसरणाऱ्या व श्वसनसंस्थेच्या आजारांत शहरात वाढ होत असल्याचे समोर आले आहे. यात न्यूमोनिया, इन्फ्युएन्झा, फुफ्फुसांचे विकास, अलेर्जेटिक दमा, दीर्घकालीन ब्राँकायटिस, सीओपीडी अर्थात क्रोनिक अबस्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज यासारख्या आजारांचा समावेश होते.

श्वसनाचे आजारांचे प्रमाण सध्या सर्वच वयोगटांमध्ये वाढलेले आहे. हे आजार वाढलेल्या प्रदूषणामुळेही होतात. ज्यामध्ये अॅलर्जेटिक दमा, ॲलर्जेटिक सर्दी, खोकला, फुफ्फुसाचे विकार वाढलेले दिसून येत आहेत. हे प्रमाण थंडीमध्ये वाढलेले दिसून येते.’

- डॉ. अभिषेक करमाळकर, वैद्यकीय तज्ज्ञ

कारणे काय?
  • बदलणारे वातावरण व वाढणारे प्रदूषण हे आजार वाढीला जबाबदार

  • वाढती बांधकामे, वाढणारी वाहने, विकासकामांसाठी करण्यात आलेले खोदकामातून सिमेंट व धुलीकणांमध्ये वाढ

  • सतत बदलणाऱ्या हवामानामुळे गेल्या काही वर्षांपासून पावसाचा लांबणारा मुक्काम

  • ढगाळ वातावरणामुळे रोगांना आमंत्रण

  • पावसाळ्यापासून सुरू होणारे आजार पुढील सहा ते आठ महिन्यांपर्यंत राहतात

  • प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने कोट्यवधींचा खर्च करून उभारलेली यंत्रणा कुचकामी

श्वसनाचे आजार हे अनेक घटकांमुळे उद्भवतात. त्यातील हवा प्रदूषण हा एक घटक आहे. हा घटक कमी होण्याच्या दृष्टीने शहरात विविध ठिकाणी हवा शुद्धीकरण प्रणाली, ड्राय मिस्ट फाउंटेन प्रणाली, रोड वॉशर यासारख्या उपकरणांद्वारे उपाययोजना करत आहोत. मात्र, श्वसनाशी निगडीत आजार होण्यामागे प्रदूषणाबरोबरच बदलणारे हवामानही कारणीभूत ठरते.

- विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.